Palghar News: पालघरमधील मोखाड्यात 'बोहाडा उत्सवा'चा जल्लोष; 300 वर्षांची परंपरा असलेला उत्सव
Palghar Mokhada News: पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील माता जगदंबाचा उत्सव (बोहाडा) मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. मोखाडा येथील 300 वर्षांपूर्वीचा हा पारंपरिक बोहाडा आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यासह दादरा नगर हवेली, नाशिक, इगतपुरी, भिवंडी, कल्याण येथील लाखो अदिवासींच श्रद्धास्थान आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदिवासी बहुल पालघरमधील मोखाडामध्ये गेल्या 300 वर्षांपासून माता जगदंबाचा उत्सव (बोहाडा) प्रतीपदेपासून सुरू होतो आणि अष्टमीपर्यंत ही यात्रा चालते. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा उत्सव दरवर्षी पार पडतो. या दिवशी संपूर्ण मोखाडा शहराला यात्रेचं स्वरूप आलेलं असतं.
लाखो आदिवासी समाजातील नागरिक या बोहाडा उत्सवाला आपली सर्व काम बाजूला ठेऊन उपस्थिती लावतात. गेल्या 300 वर्षांपासून मोखाड्याची ही परंपरा असून माता जगदंबाचा मोठा उत्सव पाहायला मिळतो. या उत्सवात सर्वधर्म समभाव पाहायला मिळतो. सर्व जाती धर्माची लोकं एकत्र येत हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडतात.
या बोहाडाच्या दिवशी येथील जगदंबा मातेच्या मंदिरापासून ते शहराच्या वेशीपर्यंत पारंपरिक वाद्याच्या तालावर देवी-देवतांची वेशभूषा आणी मुखवटा परिधान केलेली सोंगं नाचवण्याची अनोखी परंपरा आहे. ही सोंगं बघण्यासाठी अनेक लोक गर्दी करतात. रात्रभर ही सोंगं नाचवण्याची परंपरा चालत आली आहे. यात गणपती, हनुमान, वाघोबा, अशा 45 ते 50 देवी-देवतांची सोंगं नाचवली जातात.
देवी-देवतांचे मुखवटे परिधान केलेली ही सोंगं मंदिरापासून गावाच्या वेशीवर नाचत जाऊन पुन्हा येतात. त्यामुळे ही शहरातील नागरिकांवर, शेतीवर, गुरांवर येणाऱ्या संकटांवर मात करून पुन्हा मंदिराजवळ येतात, अशी आदिवासी समाजाची श्रद्धा आहे.
त्याच प्रमाणे 300 वर्षांपूर्वीची ही प्रथा अशीच कायम रहावी म्हणून सर्व धर्मीय मोठ्या उत्साहात या सगळ्यात भाग घेतात. शिवाय या बोहाडा आदिवासी परंपरेमुळे गावातील ऐक्य टिकून राहत असल्याचं मत गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरवर्षी जगदंबा उत्सवाला पालघर जिल्ह्यातून तसेच परिसरातून मोठा प्रतिसाद मिळतो. या उत्सवात सर्व जाती धर्मांची लोक एकत्र येऊन हा उत्सव दरवर्षी गुण्यागोविंदानं मोठ्या उत्साहात साजरा करतात. या उत्सवाचे महत्व असं आहे की, या उत्सवाला आजपर्यंत कधीही गालबोट लागलेलं नाही. अल्प बंदोबस्तातही हा उत्सव चांगल्या पद्धतीनं आणि सुरळीत पार पडत असतो.
या उत्सवात जातीभेद विसरून आबालवृद्ध त्यात आपलं योगदान देत असतात.
पंचावन्न ते साठ मुखवट्यांच्या ताफ्यात गणपती, मारुती, राम सीता लक्ष्मण, नूरसिंह, खंडोबा, भैरोबा, महादेव, रक्ताद हिडिंबा, त्राटिका असे अनेक मुखवटे नेसून चेहऱ्यावर रंगभूषा पोशाख करून ही सोंगं नाचवली जातात.
ठराविक घरण्याकडे दैवतांचे वाटप केलं असून त्यांच्या घराण्यांकडे हा वारसा जीवापाड जपण्याबरोबर परमश्रद्धेनं अधिकाधिक रंगदार आणि समृद्ध केला आहे.