Trimbakeshwar Yatrotsav: भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची... त्र्यंबक नगरी दुमदुमली, संत निवृत्तीनाथांचा यात्रोत्सवाला सुरुवात
सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी, धन्य धन्य निवृत्ती देवा... समाधी त्र्यंबक शिखरी.... मागे शोभे ब्रम्हगिरी...असा महिमा वर्णावा किती' मोठ्या भक्तीभावात आज त्र्यंबक नगरी नाहून निघाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त निवृत्तीनाथ महाराज समाधीची शासकीय महापूजा आज, पहाटे राज्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक केली. तर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सूर्यवंशी दाम्पत्याला दर्शनाचे पहिले मानकरी होण्याचा मान मिळाला.
तब्बल दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावानंतर यंदा मोठ्या उत्साहात संत निवृत्तीनाथांचा यात्रोत्सव साजरा होत आहे. आजपासून त्र्यंबकेश्वर यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून यात्रेनिमित्त संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी लाखो वारकरी नतमस्तक होण्यासाठी त्र्यंबकेश्वर आले आहेत.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्यांनी दुमदुमलेला परिसर आज भाविकांच्या गर्दीनं अधिकच फुलून गेला होता. गळ्यात तुळशी माळा, डोक्यावर तुळशीवृंदावन, हाती टाळ, मृदुंग, भगव्या पताका घेतलेल्या लाखो वारकऱ्यांनी त्र्यंबकनगरी गजबजून गेली आहे.
नाशिकच्या अंजनेरी ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबक नगरीत ज्योतिर्लिंगाच्या सान्निध्यात आणि गोदातिरी मोठ्या भक्तीभावात ही यात्रा संपन्न होत आहे. दरम्यान दोन दिवसांपासून मोठी गर्दी ही त्र्यंबकेश्वर नगरीत पाहायला मिळत असून दर्शन बारीत लांबच लांब रांगा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी लागल्या आहेत.
आज पहाटेपासूनच बारीत वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. ब्रम्हगिरी प्रदक्षिनेसह कुशावर्तात स्नानासाठी भाविक गर्दी करीत असून केवळ डुबकी मारून पवित्र होण्यासाठी भाविक विशेषकरुन महिलावर्गाचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे.
यंदा निर्मल दिंडी पुरस्कार देण्यात येणार आहे. जवळपास पाचशेहून अधिक दिंडया त्र्यंबकेश्वर शहरात दाखल होत असून या पार्श्वभूमीवर निर्मलवारी करण्याचा निश्चय आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या दिंड्यांसाठी महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे.
आपण थांबत असलेल्या ठिकाणी योग्य स्वच्छतेचे नियोजन केल्यास निर्मल दिंडी पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे दिंडी उपयोगी साहित्य देण्यात येणार असून स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. ज्या वारकऱ्यांना दिंडीत येणं शक्य होणार नाही, त्या भाविकांसह इतर राज्यातील भाविक, भक्तांसाठी ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.