Nashik Unseasonal Rain : सुलतानी संकटानंतर आता अस्मानी संकट, शेतकरी दुहेरी संकटात, पिके आडवी
नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी लावली. मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसतो आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या दोन दिवसांपासून वातावरणात झालेला बदल आणि हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस बरसला. आज सकाळपासून देखील वातावरण ढगाळ असून शहरातील अनेक भागात पावसाच्या सारी कोसळल्या.
काल पहाटे देखील अनेक भागात रिमझिम पाऊस बरसला. त्यानंतर काल दिवसभर ढगाळ वातावरण दिसून आले. अशातच मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सकाळपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता.
त्यामुळे एकीकडे शेतमालाला भाव नसताना दुसरीकडे अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
नाशिकसह ग्रामीण भागात आज अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता.
जिल्ह्यातील येवला पट्ट्यात निफाड, लासलगावसह अन्य काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी हजेरीमुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष यांसह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
तर पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शेतमालाला भाव मिळत नसल्याने आधीच हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवं संकट उभे राहिले आहे.
अगोदरच कांदा, पालेभाज्या, कोबी यासारख्या काही भाज्यांना बाजारात चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सुलतानी संकटासह अस्मानी संकटामुळे शेतकरी आणखी चिंतेत आले आहेत.
दरम्यान अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे अवकाळी पाऊस कोसळतो आहे. शिवाय शेती पिकावर मोठा परिणाम होत आहे.
दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण वगळता इतर महाराष्ट्रात 8 मार्चपर्यंत गडगडाटासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज आहे.