Nashik : 'धुके, थंडगार वारा, फेसाळणारे धबधबे अन् चिंब पर्यटन, नाशिकचं कोकण पर्यटकांना भुरळ घालतंय!
'हलक्या पावसाची सर, फेसाळणारे धबधबे, धुके, थंडगार वारा, हिरवाईने नटलेला परिसर' हे सगळं नाशिकपासून जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, पहिने परिसरात अनुभवयास मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक शहरात जरी पावसाची प्रतीक्षा कायम असली तरी जिल्ह्याचे कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर परिसरात दमदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे पर्यटकांना नाशिकचे 'कोकण' भुरळ घालू लागले आहे.
नाशिक शहराला पावसाची प्रतीक्षा कायम असून त्र्यंबकेश्वर शहर परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यापासूनच पर्यटक निसर्गाचा आनंद घेत आहेत.
अंजनेरीसह त्र्यंबकेश्वर, पहिने भागात चहुबाजूंनी वेढलेली सह्याद्रीची पर्वतरांग हिरवाईने नटली आहे. या नटलेल्या पर्वतरांगांवरून फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे वाहू लागले आहे.
या निसर्गसौंदर्याचे पर्यटकांमध्ये आकर्षण वाढले असून, नाशिकसह गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमधील पर्यटक आनंद घेताना दिसत आहेत.
त्र्यंबकराजाच्या दर्शनानंतर येथून जवळच असलेल्या अंजनेरी, पहिने, त्र्यंबक परिसराला भेट देतात. त्यामुळे सध्या पावसाळी सहलीसाठी शनिवार रविवारी विकेंडला पर्यटकांची गर्दी होताना दिसते आहे.
त्र्यंबकेश्वर जवळील पहिने हे गेल्या काही वर्षांपासून निसर्ग सहलीसाठी ओळखले जात आहे. या मार्गावर असलेल्या घाटाच्या दुतर्फा असलेले सहयाद्रीचे डोंगर जणू धुक्यात हरविल्याचा भास पर्यटकांना होतो.
पाऊसधाराचा वर्षाव अंगावर झेलत पर्यटक सेल्फीची हौस भागविताना दिसतात. पावसाळी सहलीचा आनंद घेतांना आजूबाजूला विविध जातीचे वृक्ष, रानभाज्या, फुलं, रानफुलं हे सगळंच बहरल्याने निसर्गाला उधाण आल्याचे दिसत.
त्यामुळे पर्यटकांना फोटो घेण्याचा मोह आवरत नाही. दरम्यान पेगलवाडी, पहिने या आदिवासी गावातील गावकऱ्यांना पर्यटकांच्या सहलीमुळे काही प्रमाणात रोजगारही उपलब्ध होताना दिसतो.
पावसाच्या आगमनाने हरसूल-वाघेरा घाटाला हिरवाईचे कोंदण लाभले आहे. हा घाट वाघेरा पाडा ते नाकेपाडापर्यंत आठ किलोमीटरचा असून वनौषधींसाठी हा घाट परिसर प्रसिद्ध आहे.