Nashik News : हाती ज्ञानेश्वरी, डोक्यावर तुळशी वृंदावन, सहाशे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत, नाशिकमध्ये मराठीचा जागर
नाशिकमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडीसह मराठी जागर करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठी भाषा गौरव दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, सार्वजनिक वाचनालय आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी गंगाधरन डी., विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महापालिका आयुक्त पुलकुंडवार आणि पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी दिंडी खांद्यावर घेतली.
ग्रंथदिंडीच्या अग्रभागी मनपाचा चित्ररथ होता. सुमारे 600 विद्यार्थ्यांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग होता. विविध शाळांची कला पथक होते. लेझीम, ढोल वादनाने चैतन्य निर्माण झाले होते.
झेंडा, झांज पथक, संबळ पथक आणि विद्यार्थ्यांच्या लाठी-काठीच्या प्रत्यक्षिकांनी लक्ष वेधले. वारकरी, कीर्तनकार, विठ्ठल-रुक्मिणी, बहिणाबाई, मुक्ताबाई, शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, भगतसिंग यांच्या वेशभूषेत मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.
मराठी भाषा, ग्रंथ यांची महती सांगणारे घोषवाक्याचे फलक हाती घेत तर काही विद्यार्थिनींनी ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथ आणि कळस, तुळशी वृंदावन डोक्यावर घेत मराठीचा जागर केला.
फुगड्या खेळत, भगव्या पताका उंचावत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सिव्हील हॉस्पिटल जिल्हाधिकारी कार्यालय, मेन रोड, शालिमार अशा मार्गाने ग्रंथ दिंडीचा प्रवास सुरू होता. शहरवासियांनी या सुंदर सोहळ्याला दाद दिली.
अनेक नागरिकांना दिंडीतील क्षणचित्रे मोबाईल मध्ये टिपण्याचा मोह झाला. प. सा. नाट्यगृहात मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडीचा समारोप झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी राजभाषेचा कौतुक करणारा हा भव्य सोहळा कायमच संस्मरणात राहणार आहे.
फुगड्या खेळत, भगव्या पताका उंचावत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सिव्हील हॉस्पिटल जिल्हाधिकारी कार्यालय, मेन रोड, शालिमार अशा मार्गाने ग्रंथ दिंडीचा प्रवास सुरू होता. शहरवासीयांनी या सुंदर सोहळ्याला दाद दिली.