Sant Nivruttinath Palkhi : सिन्नरच्या कुंदेवाडीत दिवाळी, वारकऱ्यांसाठी 250 लीटर गुळवणी, 5 हजार पुरणपोळ्यांचे जेवण
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. आज सकाळी लोणारवाडी गावातून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर आज दुपारी कुंदेवाडीत दुपारचे जेवण होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया पार्श्वभूमीवर कुंदेवाडीच्या ग्रामस्थांनी दिंडीत सहभागी भाविकांच्या जेवणासाठी 250 लिटर गुळवणी, प्रत्येक घरातून इच्छेनुसार २५ किलो आंब्याचा रस तर ५ हजाराहून अधिक पुरण पोळ्या तयार केल्या आहेत. संत निवृत्तीनाथांची दिंडी गावात येणार असल्याने गावात जणू दिवाळीचा सणाचे स्वरूप आले आहे.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करत असून आजचा सहावा दिवस आहे. ठिकठिकाणी पाहुणचार स्वीकारत मजल दरमजल करत ही पालखी पुढे सरकत असून आज सिन्नर तालुक्यातील खंबाळेमध्ये तिचा मुक्काम असणार आहे.
दुपारचे जेवण हे कुंदेगावी होणार असून जवळपास 60 वर्षांहून अधिक काळापासून या गावी दिंडीचा पाहुणचार करण्यात येतो. विशेष म्हणजे या गावची अनोखी परंपरा असून जणू दिवाळीच इथे साजरी केली जाते.
संपूर्ण गाव भगव्या पताकांनी सजले असून रस्त्यावर सडा रांगोळी काढत दिंडीचे स्वागत केले जाते. गावी दिंडी येणार असल्याने दूर दूरचे नातेवाईक कुंदेवाडीला आपल्या घरी येऊन पोहोचले आहेत.
दरवर्षी संत निवृत्तीनाथांची पायी दिंडी सिन्नरमार्गे जात असते. येथील कुंदेवाडी गावात दिंडीचा पाहुणचार केला जातो. दिंडी गावात येणार असल्याने गावात जणू दिवाळी साजरी केली जाते.
वारकऱ्यांचा पाहुणचार करण्यासाठी यंदा आमरस पुरणपोळीचा बेत गावकऱ्यांनी आखला आहे. २५ किलोचा आमरस, 250 लिटर गुळवणी, 5 हजाराहून अधिक पुरणपोळ्या तयार करण्यात येत असून घरोघरी जय्यत तयारी सुरु आहे.
गावातील प्रत्येक घरातून 21 पुरणपोळी, एक तांब्या सार, 1 ते 5 लिटर दुध आणि 21 रूपये वर्गणी काढली जाते. घरोघरी वारकरी जेवायला जातात तर काही जण ग्रामपंचायत समोर मोकळ्या जागेत पुरणपोळीचा आस्वाद घेतात.
कुंदेवाडी गावासह परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रत्येक कुटुंब कामासाठी हातभार लावत आहेत. कुंदेवाडीच्या ज्ञानेश्वर गोळेसर यांच्या घरी सर्व नातेवाईक जमले असून पहाटे 3 वाजेपासून 25 किलो आमरस, 6 किलो पुरणापासून पुरण पोळी बनवण्याचे काम महिलांकडून सुरु आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात गावातील महिला पुरणपोळी, सार, दूध घेऊन येतात.. मोठ्या पातील्यात 250 लिटर दूध आटवले जाते आहे तर 5 हजारहुन अधिक पुरणपोळीचा ढीग उभा केला जात आहे.