Mumbai NCP Protest : गळ्यात कांद्याच्या, कापसाच्या माळा, विधानभवनात राष्ट्रवादीच्या आमदारांकडून आंदोलन

नाशिकसह महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न पेटला असून आज विधानभवनातदेखील याचे पडसाद उमटले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर उतरत जोरदार आंदोलन केले. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांसह आता आमदार कांदाप्रश्नी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आज मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस असून गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न पेटला आहे. अनेक भागात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
शिवाय नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक झाले असून काल लासलगावी कांदा लिलाव बंद पाडण्यात आले. कांदा भावात सततची घसरण होत असल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे.
अशातच हा मुद्दा आता विधानभवनातदेखील गाजत असून राष्ट्रवादी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्यासह इतर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्या उतरत जोरदार आंदोलन केले.
यावेळी सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उद्ध्वस्त... शेतकरी द्रोही सरकारचा निषेध असो... कांद्याला भाव मिळालाच पाहिजे... कापसाला भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुरुवातीलाच विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून राष्ट्रवादी आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला हमीभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात कांदा लिलाव बंद पडल्याचे दिसून आले.
विधीमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडून कांद्या संदर्भात आंदोलन करण्यात आले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्नांसंदर्भात विरोधक आक्रमक झालेले आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी डोक्यावरती कांद्याच्या टोपल्या घेऊन विरोधकांनी आंदोलन केले आहे.
कांद्याला जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यत आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.