Sant Nivruttinath Palkhi : 'अश्व दौडले रिंगणी, होता टाळ-मृदंगाचा ध्वनी', सिन्नरच्या दातलीत नाथांच्या अश्वाचा गोल रिंगण सोहळा!
'या सुख कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनि संत सदनी राहिला...' आनंदाची अनुभूती देणारा, डोळे दिपवणारा नयनरम्य गोल रिंगण सोहळा दातलीत पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाऊलींच्या दोन अश्वांचा हा रिंगण सोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी सिन्नरकरांसह वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. हजारो वारकऱ्यांनी हा रिंगण सोहळा लक्ष लक्ष नेत्रांनी साठवून घेतला. यानंतर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी मुक्कामी खंबाळेकडे मार्गस्थ झाली.
संत निवृत्तीनाथांची पालखी आज दातलीत पोहचली. त्यानंतर ध्वजकरी, विणेकरी, तालवादक आणि तुळशी महिलांचे रिंगण पार पडल्यावर शेवटी माऊलींच्या आश्वाचा रिंगण सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
सर्वत्र 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय' हा जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला होता.
तत्पूर्वी सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथील मुक्काम आटोपल्यावर पालखीचे प्रस्थान सिन्नर नगरीतून पुढे जात कुंदेवाडी, मुसळगाव आणि नंतर दातली गावी रिंगण स्थळाकडे मार्गस्थ झाले.
सकाळपासूनच मोठ्या संख्येने वारकऱ्यांचा सुरू होता. सकाळी कुंदेवाडी येथे आमरस आणि पुरणपोळीचा पाहुणचार घेतल्यानंतर पालखी दिंडी दातलीकडे रवाना झाली होती.
सकाळपासूनच वारकऱ्यांची रेलचेल असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून येत होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास पायी दिंडी पालखी सोहळा दातलीत पोहोचला.
यानंतर अश्वांची पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांनी दिंडीच्या ध्वजाने रिंगणाला प्रदक्षिणा पूर्ण केल्या. स्वारीचा अश्व रिंगणासाठी सोडण्यात आला. त्याच्या पाठोपाठ मानाचा अश्वही धावला.
मानाचे अश्व दुपारी चार वाजता हजारो वारकऱ्यांसह दातली नगरीत पोहोचले. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पालखी दिंडीचे स्वागत केले. बरोबरच नाथांचा रथही पोहोचला.
यावेळी लाखो भाविकांनी 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' नामाचा एकच जयघोष केला. या जयकारात हा रिंगण सोहळा आठवणीत साठवून ठेवला.