Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन

भारतीय रेल्वेला मोठा इतिहास असून ब्रिटीशकालीन रेल्वेतील अनेक रेल्वे डबे किंवा इंजिन आजही संग्रहित ठेवा म्हणून अनेक ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वाफेवरील इंजिनापासून सुरू झालेला भारतीय रेल्वेचा प्रवास सध्या वंदे भारतच्या हायस्पीड रेल्वे इंजिनपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे, नव्याचं स्वागत होताना जुन्याच्या आठवणी सर्वत्र जपल्या जातात.

भारतीय रेल्वेत पुनर्विकासाचे वारे सुटले आहेत, मात्र त्याच वेळी जतन केलेल्या ऐतिहासिक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या हेरिटेज गॅलरीमध्ये सर लेस्ली विल्सन हे भारतातील पहिले इलेक्ट्रिक इंजिन अनेक वर्षांपासून जतन करण्यात आले होते.
मात्र, याच हेरिटेज गॅलरीच्या जागी आता सीएसएमटी स्टेशनच्या पुनर्विकासाचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे हे ऐतिहासिक इंजिन सिमेंट, खडी, कचरा आणि चिखलात धूळ खात पडले आहे.
विशेष म्हणजे 3 फेब्रुवारीला भारतीय रेल्वे विद्युतीकरणाची शंभर वर्षे साजरे करत आहे, त्यासाठी मध्य रेल्वेने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत, संपूर्ण भारतात देखील हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे.
पण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक आणि सर्वच मोठे अधिकारी ज्या ठिकाणी बसतात त्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ऐतिहासिक इंजिनला आज हे दिवस बघावे लागत आहेत.
सर लेस्ली विल्सन हेच इंजिन नाही तर वाफेवर चालणारी ऐतिहासिक क्रेन, पहिली तिकीट प्रिंटिंग मशीन अशा अनेक गोष्टी याच वाईट अवस्थेत सध्या पडून आहेत.
सी एस एम टी पुनर्विकासाचे काम सुरू होण्यापूर्वी हा ऐतिहासिक ठेवा दुसरीकडे हलवला असता तर आज ही दुर्दशा झाली नसती. सिमेंटमध्ये गाडल्या गेलेल्या हेरिटेज गॅलरीला पाहून रेल्वे प्रवाशांनी दु:ख आणि संतापही व्यक्त केला आहे.