मोदी बाळासाहेबांसमोर नतमस्तक; मोदींच्या दौऱ्याआधी गिरगावात पोस्टरबाजी, 'या' फोटोची कहाणी काय?
पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मोदी मुंबईत येणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोदींच्या दौऱ्यासाठी संपूर्ण मुंबई सज्ज झाली असून ठिकठिकाणी पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
अशातच मोदींच्या दौऱ्याआधी गिरगावात ठाकरे गटाकडून पोस्टर झळकावण्यात आल्याचं बोललं जात आहे.
दक्षिण मुंबईतील गिरगावात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदींचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
या पोस्टर्समध्ये मोदी बाळासाहेबांचा हात हातात घेऊन वाकून नमस्कार करत आहेत.
गिरगाव येथे बाळासाहेब ठाकरे आणि मोदी यांचे बॅनर्स लावले असून यामध्ये 'बाळासाहेबांपुढे मोदींची मान झुकते', असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
या फोटोमागे एक किस्सा आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी बोलताना गुजरात दंगलीनंतरचा एक किस्सा सांगितला होता. त्याचप्रमाणे बाळासाहेबांनीही भाषणातही किस्सा सांगितला होता. गुजरात निवडणुकीच्या वेळी टीम इंडियाचा ऑलराउंडर रविंद्र जाडेजा याने यासंदर्भातील बाळासाहेबांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला होता.
गुजरात दंगलीनंतर मोदींविरोधात राजकारण तापलं होतं. त्यावेळी भाजपचं सरकार होतं. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, तर लालकृष्ण अडवाणी देशाचे गृहमंत्री होते. तर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी हटाओ अशी मागणी होत होती. यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींना खरंच हटवावं का? तुम्हाला काय वाटतं? अशी विचारणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडे केली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी 'उन्हें मत छुओ. मोदी गया तो गुजरात गया' असं म्हटलं होतं.
याच पार्श्वभूमीवर गिरगावात मोदी आणि बाळासाहेबांचे फोटो लावून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. बाळासाहेबांमुळेच आज मोदी आहेत, असा उल्लेख शिवसैनिकांकडून वारंवार केला जातो. त्यामागील पार्श्वभूमी म्हणजे, बाळासाहेबांनी गुजरात दंगलीच्या वेळी मोदींना दिलेला पाठिंबा आहे.