Mumbai Accident: ब्रेकऐवजी एक्सलेटर दिला अन्...; मुंबईत हिट अँड रन केस, फरार चालक अटकेत
मुंबईतील मुलुंड परिसरात हा अपघात झाला आहे. अपघातानंतर कार चालकानं घटनास्थळावरुन पळ काढला होता. आता याप्रकरणी आरोपी अमरीश यादव याला अटक करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अमरीश यादव महाविद्यालयीन विद्यार्थी असून तो 22 वर्षांचा आहे.
मुंबईतील मुलुंड परिसरात भरधाव वेगात असलेल्या कारनं तुकाराम सावंत या 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीला आणि स्कूटर चालकाला धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
दोन्ही जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र अपघातात झालेली दुखापत गंभीर असल्यानं तुकाराम सावंत यांचा मृत्यू झाला. तर स्कूटर चालकावर अद्याप उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर कार चालक कार घटनास्थळीच सोडून पळून गेला. त्यानंतर मुलुंड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम 279, 304 (अ), 337, 338 आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन कार चालकाचा शोध सुरु केला. त्यानंतर मुलुंड पोलिसांनी आरोपी अमरीश यादवला अटक केली.
आरोपीनं दिलेल्या जबाबानुसार, ब्रेक लावण्याऐवजी गोंधळून चुकून एक्सलेटर दिल्यामुळे गाडीचा वेग वाढला आणि त्यातच हा अपघात झाला. अपघातानंतर घाबरुन गेल्यानं कार तिथच सोडून पळ काढल्याचंही चालकानं सांगितलं.
दरम्यान, चालकाच्या चुकीची शिक्षा मात्र तुकाराम सावंत आणि त्यांच्या कुटुंबाला भोगावी लागली.
तुकाराम सावंत यांच्या अपघाती निधनामुळे सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.