PHOTO | प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर यांनी गरजूंसाठी पोळ्या लाटल्या; सामाजिक संघटनांकडूनही मोफत जेवण
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक गरीब, भिक्षूक, बेघर यांचे मोठे हाल होत आहेत. अनेकांना दोन वेळेचे जेवण देखील वेळेवर मिळत नाही. अशा कठीण काळात सोलापुरातील अनेक सामाजिक संघटना, कार्यकर्ते पुढे येताना पाहायला मिळत आहे. सोलापुरात काँग्रेसतर्फे देखील एका स्तुत्य उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'मदतीचा एक घास' या उपक्रमाअंतर्गत लॉकडाऊनच्या काळात सोलापूर शहरातील गरीब, बेघर, झोपडपट्टीत राहणारे गरजू आणि रस्त्यावर भाकरीसाठी वणवण फिरणारे भिक्षूक यांच्यासाठी जेवणाची सोय काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे.
'मदतीचा एक घास' या उपक्रमाअंतर्गत लॉकडाऊनच्या काळात सोलापूर शहरातील गरीब, बेघर, झोपडपट्टीत राहणारे गरजू आणि रस्त्यावर भाकरीसाठी वणवण फिरणारे भिक्षूक यांच्यासाठी जेवणाची सोय काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे.
सोलापूर शहरातील विविध झोपडपट्ट्या, कामगार वस्ती तसेच रस्त्यावरील गरजूंना या जेवणाचे वाटप काँग्रेसचे कार्यकर्ते करताना दिसून येत आहेत. दररोज 1500 ते 2 हजार पोळी गरजूंना वाटप करण्याचे प्रयत्न काँग्रेसतर्फे केले जात आहेत. तर लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशिवाय समाजातील सर्वच नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवून गरजूसाठी पोळ्या लाटल्या.
महिला या संवेदनशील असतात, त्यांना परिस्थिती अधिक चांगली समजून घेता येते. त्यांना सर्वांच्या पोटाची चिंता असते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे तसंच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रणिती शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला.
कोरोनाच्या काळात आरोग्य व्यवस्थेबरोबरच भूकेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असताना विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष मदत करताना दिसत आहेत. जय हिंद फूड बँक या संघटनेच्या वतीने जेवणाचं मोफत वाटप केलं जात आहे.
एमआयएमचे नेते तसेच उद्योजक फारुख शाब्दी यांच्यातर्फे तब्बल 10 हजार कुटुंबाना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक कीटमध्ये 5 किलो तांदूळ, पीठ, 1 किलो तेल, 1 किलो दाळ अशा पद्धतीचे साहित्य करण्यात आले आहे. मागील लाटेत देखील शाब्दी यांच्यावतीने 10 हजाराहून अधिक कुटुंबाना अन्नधान्य वितरीत करण्यात आले होते.
रुग्णालयांच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणासाठी मोठे हाल होत असतात. कोरोनाच्या काळात तर लॉकडाऊनमुळे अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद आहेत. हीच गरज ओळखून सोलापुरातील अनेक सामाजिक संघटना जेवणाची सोय करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. रोटी बँक या संघटनांच्यावतीने रुग्णालय परिसरात तसेच शहरातील विविध भागात मोफत जेवणाची सोय करण्यात येत आहे.
मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या संभव फाउंडेशनतर्फे देखील रस्त्यावर फिरणारे मनोरुग्ण, भिक्षुक यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली जात आहे. दररोज शेकडो लोकांना मोफत जेवण या संस्थांच्या प्रयत्नांमुळे मिळत आहे.