PHOTO : माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे पत्नीसोबत दुसऱ्यांदा 'बोहल्यावर'
अकोल्यात एक 'हटके' लग्नसोहळा पार पडलाय. या लग्नात नवरदेव-नवरीच्या मुलांसह नातूही वरातीत थिरकलेत.. यातील नवरदेव 68 वर्षांचा तर नवरी 58 वर्षांची.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर चि. गुलाबराव आणि वधू चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी आशाताई. हळद, मेहंदी, वरात, मंगलाष्टके अन् जेवणावळी असं सारं काही या लग्नात होतं.
वधू-वर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आयुष्यात हा योग दुसऱ्यांदा आला होता. अन् तोही तब्बल 41 वर्षांनी. या दांपत्याचं लग्न झालं होतं 11 मे 1981 मध्ये.
गुलाबराव गावंडे हे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री आहेत. बुधवारी त्यांच्या लग्नाचा 41 वा वाढदिवस होता.
गुलाबराव गावंडे अन् पत्नी आशाताई लग्नाच्या तब्बल 41 वर्षांनी परत बोहल्यावर चढले. हे सारं घडवून आणलं होतं त्यांचे मुलं, मुली, नातू, नातेवाईक आणि आप्तेष्टांनी.
अकोल्यातील हिंगणा रोडवरच्या गुलाबराव गावंडे यांच्या आश्रमात हा 'शाही' विवाहसोहळा पार पडला.
लग्नमंडपात मंगलाष्टकं सुरू असतांना गुलाबराव आणि आशाताईंच्या डोळ्यांसमोरून आयुष्यातील संघर्ष अन आनंदांच्या आठवणींचा पट झरझर सरकत होता. अंगावर अक्षता पडत असतांना अनेकदा त्यांचे डोळे पाणावले होते.
लग्नाच्या आधी घोड्यावरून गुलाबरावांची भव्य वरात काढण्यात आली. या वरातीत गुलाबरावांच्या परिवारासह मित्र आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
गुलाबराव गावंडेंनी सक्रिय राजकारणातून बाजूला होत घरातील नव्या नेतृत्वाला पुढं केलं आहे. अनेक संघर्ष पचवलेल्या या नेत्यासाठी कालचा दिवस मात्र सर्वार्थानं वेगळा होता.
अलिकडे नात्यांचे बंध आणि विण सैल होतांना दिसते आहे. सध्याच्या वृद्धाश्रम संस्कृतीत गुलाबराव गावंडेंचा हा लग्नसोहळा इतर मुलांना आई-वडिलांवर प्रेम करण्याचा संदेश देणारा आहे.