Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सावधान! तुम्ही खाताय तो डिंक आरोग्यासाठी घातक तर नाही ना? डिंक मिळविण्यासाठी झाडांना इंजेक्शन दिलं जातंय!
आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून हिवाळ्याच्या दिवसात अनेकजण मेथीचे आणि डिंकाचे लाडू बनवतात. मात्र झाडापासून हा डिंक मिळविण्यासाठी आता झाडाला रासायनिक इंजेक्शन दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यात समोर आला आहे. त्यामुळं हा असा डिंक खाणे आरोग्यासाठी घातक तर ठरत नाही ना? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथंडीचा जोर वाढला की पौष्टिक आहार म्हणून सुका मेवा घालून साजूक तुपात मेथीचे आणि डिंकाचे लाडू खाण्यासाठी बनवले जातात. हिवाळ्यात हे लाडू खाल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होत असल्याचं सांगितले जाते.
या दिवसात कोणतेही सुका मेव्याचे लाडू तयार करताना त्यामध्ये पौष्टिक आणि आरोग्यदायी म्हणून डिंकाचा वापर केला जातो. मात्र हल्ली डिंक मिळणं अवघड काम ठरू लागले आहे. यावर काही जणांनी उपाय शोधून काढला असून पारंपरिक पद्धतीने झाडाला कुऱ्हाडीने खाच मारून त्यात रासायनिक इंजेक्शन देऊन कमी कालावधीत अधिक डिंक मिळविण्याचे तंत्र विकसित केल्याने डिंक उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
असले तरी डिंक मिळविण्याच्या या अनैसर्गिक पद्धतीने झाडाचे कायमस्वरुपी नुकसान होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत तर अशा पद्धतीने उत्पादित केलेला डिंक मानवी आहारात घेणे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.
डिंक मिळविण्यासाठी झाडाला खाच पाडून त्यात रासायनिक इंजेक्शन देऊन डिंक गोळा करणे हे केवळ मानवी आरोग्यासाठीच नव्हे तर जंगल आणि पर्यावरण या दोन्हीसाठी घातक असल्याचं पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.
कारण अधिकचा डिंक मिळविण्यासाठी झाडाला देण्यात येत असलेले इथेप्योन आणि प्याराकॉट नावाचं इंजेक्शन झाडामध्ये सोडले जाते. हे इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसातच खाच मारलेल्या ठिकाणी डिंकाचे लोटच बाहेर पडू लागतात. मात्र एकाच झाडावर वारंवार अशाच पद्धतीने खाच पडून इंजेक्शन दिले गेल्याने झाडं कमकुवत होऊन ते लवकरच नामशेष होत असल्याचं पर्यावरण प्रेमींचे मत आहे.
अशा पद्धतीने डिंक गोळा करण्याची पद्धत जळगाव जिल्ह्यात सर्वच जंगल परिसरात सरास सुरू असल्याने पुढील काळात हजारो एकरवरील जंगल धोक्यात येणार असल्याचं तज्ञांचे मत आहे.
डिंक गोळा करणे हा या ठिकाणी असलेल्या स्थानिकांचा अधिकार आहे. या अधिकाराला धक्का न लागता आणि जंगलाचा नाश न होता डिंक कसा काढता येईल याबाबत शास्त्रीय पद्धत वनविभागाने ग्रामीण भागातील लोकांना सांगायला पाहिजे अस मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.
डिंक मिळविण्यासाठी झाडाला रासायनिक इंजेक्शन दिले जाऊन काही जण डिंक उत्पादन करत असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. मात्र याबाबत आमच्याकडे एकही घटना करताना कोणी आढळून आलेलं नाही, असं वनविभागानं सांगितलंय. वनउपज गोळा करण्याचे अधिकार हे ग्रामपंचायतीला असल्याने त्यांना याबाबत आम्ही सूचना देऊन हे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करत असतो.
या घटनांबाबत कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात यावी या बाबत कोणत्याही प्रकारची कायदेशीर बाब नमूद नसल्याने कारवाई करताना मर्यादा असल्याचं वन अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मात्र झाडांना इजा पोहोचवल्याप्रकरणी आम्हाला कुणी आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा वन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.