कर्नाटकच्या जनतेच्या मनातील लोकप्रिय नेता, सिद्धरमय्या... दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ, पाहा त्यांची कारकीर्द
Karnataka New CM Profile: काँग्रेस नेते सिद्धरमय्या यांचा सरकार चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आणि राज्यभरातील तळागाळातील मतदारांच्या पाठिंब्यामुळेच काँग्रेस नेते सिद्धरमय्या आज मुख्यमंत्री पदी विराजमान होत आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनऊ वेळा आमदार राहिलेले सिद्धरमय्या यांनी 2006 मध्ये JD(S) सोडलं आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच सिद्धरमय्या यांनी चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी त्याच मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवली आणि विजयही मिळवला.
2024 च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून काँग्रेस नेतृत्वानं 75 वर्षीय सिद्धरमय्या यांना मुख्यमंत्री पद बहाल करण्याचा विचार केला. कारण कर्नाटकातील ओबीसी, अनुसूचित जाती आणि मुस्लिमांमध्ये सिद्धरमय्या प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांची हीच लोकप्रियता पुढील सार्वत्रिक निवडणुकीत विजय-पराभवाची समिकरणं बदलण्यासाठी महत्त्वाची ठरु शकते.
यंदा सिद्धरमय्या दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सिद्धरमय्या यांनी यापूर्वी 2013 ते 2018 दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. त्यांना केवळ सरकार चालवण्याचाच नव्हे तर जात आणि वर्गाचं वर्चस्व असलेल्या कर्नाटकातील विविध समुदायांच्या हितसंबंधांमध्ये समतोल साधण्याचाही मोठा अनुभव आहे.
सिद्धरमय्या यांना काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांचाही पाठिंबा आहे, ज्यांनी राज्यातील पक्षाच्या विधीमंडळ पक्षाच्या पहिल्या बैठकीत झालेल्या गुप्त मतदानात मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाच्या बाजूनं मतदान केलं.
कर्नाटकातील निवडणूक प्रचारात सिद्धरमय्या यांची सर्वसामान्यांमध्ये असलेली लोकप्रियता स्पष्टपणे दिसून आली होती. एवढंच नाही तर राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'तही सिद्धरमय्या यांची जनमानसात असलेली लोकप्रियता दिसून आली होती. त्यांच्या आवाहनावरून या पदयात्रेत लोक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच, राज्यात पक्षाची सत्ता आल्यास सिद्धरमय्या हेच मुख्यमंत्रिपदाचे सर्वात योग्य उमेदवार असतील यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही एकमत होतं.
2008 च्या लोकसभा निवडणुकीसाठी, सिद्धरामय्या यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी (KPCC) च्या प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि पक्षाच्या बाजूनं जास्तीत जास्त मतं मिळवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले होते.
काँग्रेस पक्षाचे दिवंगत देवराज उर्स यांच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे सिद्धरमय्या हे कर्नाटकचे एकमेव मुख्यमंत्री आहेत.
12 ऑगस्ट 1948 रोजी म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा हुबळी येथे सिद्धरमय्या यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. तसेच, घरची परिस्थितीही बेताचीच होती.
म्हैसूर विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी मिळवणारे ते त्यांच्या कुटुंबातील पहिले सदस्य होते. त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून कायद्याची पदवीही घेतली आणि काही काळ वकिलीही केली.