पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी 'या' गोष्टी करा...
पावसाळा आला की साथीचे आजार पसरण्याचा धोका दरवर्षी निर्माण होतो. यामुळे पावसाळ्यात तब्येतीची काळजी घेणं थोडं अधिक गरजेचं होते. योग्य ती काळजी घेतली, पावसाळी आजारांबद्दलची नीट माहिती असली तर या साथीच्या आजारांपासून आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करणं सहज शक्य होते. पावसाळ्यामध्ये आपली आणि आपल्या कुटुंबियांची प्रकृती चांगली राहावी, यासाठी काय करायला हवं हे जाणून घेऊया
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसाळ्यातील आजारांना प्रतिबंध घालणे कॉलरा (cholera), टॉयफाईड (typhoid) आणि हेपेटायटीस ए (hepatitis A) या आजारांच्या साथी पावसाळ्यात पसरतात. या आजारांचा संसर्ग होऊ नये यासाठी आपण जे पाणी पितो ते स्वच्छ असावे याची खात्री केली पाहिजे. पिण्यासाठी आणि जेवण बनवण्यासाठी उकळलेले , गाळलेले पाणी वापरावे.
स्वच्छता राखल्याने पावसाळ्यात होणारा जंतुसंसर्ग टाळता येतो. पाणी आणि साबणाने सतत हात धुवत राहावे. खासकरुन जेवण करण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी हात धुणे अत्यंत गरजेचे आहे. जर साबण नसेल तर हात सॅनिटायझरने स्वच्छ करावेत. आपल्या परिसर स्वच्छ असावा, परिसरात घाण, कचरा साठलेला नसावा याची आपण काळजी घ्यायला हवी.
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारखे डासांमुळे पसरणारे आजार होतात. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत, जिथे पाणी जमा होतं तिथं डासांची पैदावार होत असते. याला प्रतिबंध घालण्यासाठी आजूबाजूला पाणी साचू देऊ नये. डास चावू नये यासाठी बाजारात मिळणारी क्रीम लावावीत किंवा इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. जेवढे शक्य आहेत तेवढे शरीर झाकणारे कपडे घालावेत. मच्छरदाणीचा वापर केल्याने डास चावण्याचे प्रमाण कमी करता येते.
आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपण आजारांचा मुकाबला समर्थपणे करु शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळे, भाज्या आणि धान्याचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. समतोल आहार घ्यावा, भरपूर पाणी पीत राहावे आणि पुरेशी झोप घ्यावी. नियमित व्यायाम करणे आणि ताणावर नियंत्रण ठेवणे याचाही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो.
पावसाळ्यामध्ये विविध प्रकारच्या आजारांपासून बचावासाठी आपले लसीकरण झालेले असणे हे देखील गरजेचे आहे. टिटॅनस, हेपेटायटिस आणि इन्फ्लुएन्झा या आजारांपासून बचावासाठी लसी उपलब्ध असून या घेणे फायदेशीर ठरते. आपण ज्या भागात राहतो तो भाग लक्षात घेऊन आणि आपल्या प्रकृतीची पाहणी करुन तज्ज्ञ मंडळी आपल्याला कोणती लस घ्यायला हवी याबाबत मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळे त्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.
पावसाळ्यात खाण्या-पिण्याचे पदार्थ दूषित होण्याचा मोठा धोका असतो. यामुळे पावसाळ्यात खाता-पिताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. पावसाळ्यात कच्च्या गोष्टी खाणे टाळावे. शिजवलेले अन्न खावे. रस्त्यावर मिळणारी कापलेली फळे शक्यतो खाऊ नयेत. फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्याव्यात.
पावसाळ्यात सुसज्ज असेल प्रथमोपचार किट आपल्याजवळ असेल तर ते फायदेशीर ठरते. पावसाळ्यात कधीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते. त्याचा मुकाबला करण्यासाठी हे किट उपयोगी पडते. या किटमध्ये ताप, खोकला, अंगदुखी याशिवाय इतर त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने विकत घेतलेली औषधे ही एकत्र ठेवावीत. याशिवाय बँडेज, अँटेसेप्टीक औषधे, थर्मामीटर आणि ओआरएस याचाही या किटमध्ये समावेश करावा.
तापाची कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडून प्रकृती तपासून घेतली पाहिजे. पटकन वैद्यकीय मदत घेतल्यास आजार बळावण्याची शक्यता कमी होते आणि आपल्याला होणारा त्रासही टळतो. डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य ती औषधे वेळेवर घेणे यात अजिबात हयगय करु नका.
पावसाळ्यात प्रवास करणार असाल तर हवामानाची योग्य ती माहिती आपण ठेवली पाहिजे. त्यानुसार जी औषधे किंवा आपल्या प्रकृतीला आवश्यक आहेत अशा गोष्टी सोबत बाळगल्या पाहिजेत. उदा.डास, माश्या आणि किडे दूर ठेवण्यासाठीची क्रीम किंवा लोशन.