ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा 'माझा सन्मान' पुरस्कारानं गौरव; पाहा फोटो
जिंगल्सची गुणगुणायला लावणारी धून असो..शीर्षकगीतांचे मनात रुंजी घालणारे स्वर असो.. किंवा मग टांग टिंग टिंगासारखं बसल्या जागी ताल धरायला लावणारं मोरुची मावशीमधलं गाणंही… संगीताच्या आकाशात गेली पाच दशकं मुक्त भ्रमंती करणारे आणि सुरेल चालींच्या असंख्य ताऱ्यांनी हे नभांगण सजवणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना 'माझा सन्मान' (Majha Sanman 2023) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्यमवर्गीय गिरणी कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या पत्कींचा पेटीवादक ते संगीतकार हा सूरप्रवास थक्क करणारा आहे. गोवा हिंदू असोसिएशनमध्ये पंडित जितेंद्र अभिषेकींसोबत त्यांचे सूर जुळले आणि अशोक पत्कींच्या कारकीर्दीचं संगीत आणखी बहरलं, सुरेल झालं.
पुढे 'सप्तसूर माझे' म्हणत त्यांनी साडेपाच हजारांहून अधिक जिंगल्स, 300 हून अधिक शीर्षक गीतं, 500 भावगीतं, 250 हून अधिक नाटकांचं पार्श्वसंगीत अशी विस्मयचकित करणारी स्वरसेवा केलीय.
'अंतर्नाद' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्काराचा तुराही आपल्या शिरपेचात खोवणाऱ्या पत्कीकाकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलंय.
वयाची 80 पार झाल्यावरही टी-ट्वेन्टीच्या जमान्यातील एनर्जीसह फाईव्ह जीच्या वेगाने काम करणाऱ्या या चिरतरुण संगीतकाराला माझाचा कृतज्ञतापूर्वक मानाचा मुजरा.
संगीतकार अशोक पत्की यांच्यासोबतच सुरेश वाडकर , केदार शिंदे, अभिनेत्री श्रद्धा कपूर, यांना देखील एबीबी माझाच्या 'माझा सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
एबीपी माझाकडून देण्यात येणारा 'माझा सन्मान' 2023 हा पुरस्कार सोहळा आज आणि उद्या म्हणजेच, 26 आणि 27 रोजी एबीपी माझावर पाहता येणार आहे.
'माझा सन्मान' 2023 या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.