Badlapur School Case : आता शाळेतही मुली सुरक्षित नाही? कोलकात्यानंतर आता बदलापूरमध्येही तेच; पद्धत वेगळी, पण अत्याचार सारखेच
अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली, ही घटना समोर आल्यानंतर बदलापूरमध्ये स्थानिकांचा आक्रोश पाहायला मिळाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंगळवारी (20 ऑगस्ट) बदलापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. स्थानिकांच्या वतीने बदलापूर बंदची हाक देण्यात आली. आरोपीला शिक्षेच्या मागणीसाठी अवघं बदलापूर रस्त्यावर उतरलं.
बदलापूर रेल्वे स्थानकावर शेकडो आंदोलक जमा झाले आणि त्यांनी सर्व रेल्वे रोखून धरल्या. सकाळी 11 वाजल्यापासून बदलापूरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
या दरम्यान पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी लाठीचार्जचा प्रयत्न केला.
त्याच वेळी बदलापूरमध्ये शाळेच्या ठिकाणी जमलेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत काय काय झालं? पाहूया.
बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला.
लघ्वीसाठी जाताना शाळेच्याच शिपायाकडून या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. एका मुलीसोबत 12 ऑगस्टला आणि दुसऱ्या मुलीसोबत 13 ऑगस्टला हे दुष्कृत्य केलं गेलं.
पीडितेपैकी एका लहान मुलीने आपल्या पालकांना लघवीच्या जागी दुखत असल्याचं सांगितलं आणि हा प्रकार उघडकीस आला. हा संपूर्ण प्रकार अंगावर काटा आणणारा आहे.
दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी 16 ऑगस्टला पोलीस ठाण्यात धाव घेतली, परंतु गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 12 तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. या प्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बाथरुमला जाण्यासाठी पुरुष शिपायासोबत मुली एकट्या कशा पाठवल्या? सेविका असताना त्या सोबत का गेल्या नाहीत? असा संतप्त सवाल पालकांकडून विचारला जातोय. तर बदलापूर बंदनंतर मात्र लोकांकडून आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशा प्रकारच्या मागण्या जोर धरत आहेत.
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत.
बदलापूर लैंगिक शोषण घटनेची सखोल चौकशी केली जाईल. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी कडक नियमावली बनवण्याच्या सुचना दिल्या आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.