photo : कुंभारवाडे बाप्पाच्या तयारीत मग्न, यंदा तरी आर्थिक चाक फिरण्याच्या आशेवर तीन महिने आधी पासून मूर्ती बनविण्यास सुरुवात!
कोरोना संकटाचा सर्वात जास्त फटका बसला तो बारा बलुतेदारांना, गेले दीड वर्षे अतिशय अडचणीतून दिवस काढत असलेल्या कुंभार समाजाला आता आशा लागून राहिली आहे ती गणेश उत्सवाची.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या वर्षी कोरोनामुळे बाप्पाचा उत्सव देखील कडक निर्बंधात गेल्याने कर्जे वाढत गेली होती. यंदाची कोरोना दुसरी लाट पहिल्यापेक्षा भयानक असल्याने यंदाही कुंभार समाजाचे मातीचे डेरे निम्म्यापेक्षा जास्त तसेच पडून राहिले.
आता किमान बाप्पाचा उत्सव तरी सर्व आर्थिक विघ्ने दूर करेल या आशेवर कुंभार समाजाने पुन्हा कंबर कसली असून तीन महिने आधीच कुंभारवाड्यात सध्या बाप्पाच्या मुर्त्या बनविण्याची लगबग सुरु झाली आहे.
गेल्या वर्षी बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीवर बंधने आल्याने कुंभार समाजाचा मोठ्या मुर्त्यांची व्यवसाय बंद झाला आहे . अशातच आता यंदा लहान मुर्त्या बनविण्यावर जोर धरण्यात आला असून येथे शाडू माती , कुंभार माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिस च्या शेकडो मुर्त्या बनविण्याचे काम रोज सुरु आहे.
पंढरपूर मधील कुंभारवाड्यात जवळपास २५ कारखाने असून या कारखान्यात कुंभार कुटुंबे या मुर्त्या बनवीत आहेत . आर्थिक अडचणीमुळे मजूर लावणे शक्य होत नसल्याने घरातील शाळकरी मुले देखील या मुर्त्या बनवू लागले आहेत.
उत्तर प्रदेश मधून आणण्यात येणाऱ्या मातीच्या किमतीत २५ टक्क्यांनी वाढ झाल्याने अडचणी वाढल्या आहेत . मात्र तरीही बाप्पा यंदा तरी विघ्ने दूर करील या आशेवर विविध प्रकारच्या आकर्षक मुर्त्या बनविण्याचे काम सुरु आहे.
कुंभारवाड्यात बनलेल्या या मुर्त्या सोलापूर , सांगली , सातारा आणि कर्नाटकातील विजापूर या भागात मोठ्या प्रमाणात विक्री होतात . मागणीनुसार विविध प्रकारच्या साच्यात या विविध आकारातील आकर्षक मुर्त्या आकार घेऊ लागल्या आहेत . यंदा कोरोनाचे संकट दूर होऊन पुन्हा जगायची ताकद दे अशीच मागणी कुंभार समाज बाप्पाकडे करीत आहे.