सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी योजना सुरू, कोणत्या दराने खरेदी करता येईल सोनं?
बहुतांशी भारतीय गुंतवणूकीचा चांगला पर्याय म्हणून सोनं खरेदी करतात. सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करून गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, सोनं चोरीची चिंतादेखील सतावत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोन्यात गुंतवणूक करण्याकडे कल असलेल्या गुंतवणूकदारांसाठी सरकारने सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सार्वभौम सुवर्ण रोखे (Sovereign Gold Bond) खरेदी योजनेची आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. येत्या पाच दिवस सोने खरेदी करता येणार आहे. या योजनेत सोनं खरेदी करण्यासाठी सवलत मिळत आहे.
गोल्ड बॉण्डसाठी 5197 रुपये प्रति ग्रॅम इतका दर निश्चित करण्यात आला आहे. तुम्ही या Sovereign Gold Bond साठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यास प्रति ग्रॅम तुम्हाला 50 रुपयांची आणखी सवलत मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला एक ग्रॅम सोने खरेदीसाठी 5147 रुपये इतका दर द्यावा लागेल.
सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदीवर तुम्हाला दरवर्षी 2.50 टक्के व्याज मिळते. दर सहा महिन्यांनी व्याजाची रक्कम तुमच्या खात्यावर जमा होते.
भारतीय व्यक्ती, अविभाजित हिंदू कुटुंब (HUF), न्यास, धर्मादाय संस्था सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी करू शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदार एका वर्षात अधिकाधिक चार किलो सोने खरेदी करू शकतात. त्याशिवाय, ट्रस्ट अथवा संस्था एका वर्षात अधिकाधिक 20 किलोचे सुवर्ण रोखे खरेदी करू शकतात.
डिजीटल माध्यमातून सुवर्ण रोखे खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना 50 रुपयांची अधिकची सवलत मिळणार आहे. गुंतवणूकदारांना निर्धारीत करण्यात आलेल्या मूल्यावर दरवर्षी 2.5 टक्के दराने सहामाही व्याज दर दिला जाईल. Sovereign Gold Bond चा कालावधी हा आठ वर्षांचा असणार आहे. पाच वर्षानंतर ग्राहकांना या बॉण्डमधून बाहेर पडता येईल.
गुंतवणूकदारांना या गोल्ड बॉण्डला स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL) , पोस्ट ऑफिस आणि स्टॉक एक्सचेंज एनएसई आणि बीएसईच्या माध्यमातून खरेदी करता येईल.
सुवर्ण रोखेचे जेवढे युनिट खरेदी कराल, त्याच्या मूल्याइतकी रक्कम तुमच्या डिमॅट अकाउंटमधून वजा करण्यात येईल. स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकेच्या माध्यमातून तुम्हाला सुवर्ण रोखे खरेदी करता येणार नाही.
सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी योजनेची पहिली सीरिज याआधी 20 जून ते 23 जून 2022 या कालावधीत खुली झाली होती. या दरम्यान गुंतवणूकदारांना स्वस्त दरात सोनं खरेदी करण्याची संधी मिळाली होती.