Independence Day 2024 : तिरंग्याआधी 'सात'वेळा बदलला गेला भारताचा राष्ट्रध्वज; कसे दिसायचे आधीचे झेंडे? काय आहे इतिहास?
स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशातील राजकीय घडामोडींसोबत राष्ट्रध्वज बदलत गेले. राष्ट्रीय ध्वजाच्या उत्क्रांतीचे ऐतिहासिक टप्पे जाणून घेऊया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताचा पहिला ध्वज : भारतीय ध्वजाची निर्मिती स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. 1904-1906 मध्ये पहिला भारतीय ध्वज अस्तित्वात आला आणि तो स्वामी विवेकानंदांच्या आयरिश शिष्य सिस्टर निवेदिता यांनी बनवला. काही काळानंतर हा ध्वज सिस्टर निवेदितांचा ध्वज म्हणून ओळखला जाऊ लागला. हा ध्वज लाल आणि पिवळ्या रंगांचा होता. लाल रंग स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक आहे आणि पिवळा रंग विजयाचे प्रतीक आहे. या झेंड्यावर बंगाली शब्दात ‘बोंडे मातोरम’ असं लिहिलं होतं. त्यात 'वज्र'ची आकृती, 'इंद्र' देवाचे शस्त्र आणि मध्यभागी एक पांढरं कमळ देखील होतं.
भारताचा दुसरा ध्वज : आणखी एक ध्वज 1906 मध्ये तयार करण्यात आला . हा तिरंगा ध्वज होता, ज्याच्या वरच्या बाजूला निळ्या, मध्यभागी पिवळा आणि खालच्या बाजूला लाल रंगाच्या तीन समान पट्ट्या होत्या. निळ्या पट्टीमध्ये वेगवेगळ्या आकाराचे आठ तारे होते. पिवळ्या पट्टीत देवनागरी लिपीत 'वंदे मातरम' लिहिलेलं होतं. लाल पट्टीमध्ये दोन चिन्हं होती, एक सूर्याचं आणि दुसरं चंद्रकोर ताऱ्याचं.
भारताचा तिसरा ध्वज : 7 ऑगस्ट 1906 रोजी दुसऱ्या ध्वजात थोडा बदल करण्यात आला. ध्वजात लाल, पिवळे आणि हिरव्या रंगाच्या तीन आडव्या पट्ट्या होत्या. हा ध्वज 'कलकत्ता ध्वज' किंवा 'कमळ ध्वज' म्हणून ओळखला जाऊ लागला. या झेंड्याच्या मधोमध वंदे मातरम् असं लिहिलं होतं. पहिल्या पट्टीत आठ अर्धी खुली कमळं होती. तिसऱ्या पट्टीत एका कोपऱ्यात सूर्य आणि दुसऱ्या कोपऱ्यात चंद्रकोर होती. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी भारताच्या एकात्मतेचं प्रतीक म्हणून हा ध्वज फडकावला होता.
भारताचा चौथा ध्वज : 22 ऑगस्ट 1907 रोजी मादाम कामा यांनी स्टुटगार्ट, जर्मनी येथे ध्वज फडकवला. असं म्हणतात की तिथे मादाम कामा, विनायक दामोदर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांनी एकत्रितपणे ध्वजाची रचना केली होती. परदेशात फडकलेल्या पहिल्या भारतीय ध्वजाचा दर्जा या ध्वजाने मिळवला. त्याला बर्लिन समितीचा ध्वज असंही संबोधलं जायचं. या ध्वजाला वरती केशरी, मध्यभागी पिवळा आणि शेवटी हिरव्या रंगाची पट्टी होती. या झेंड्याच्या मधोमध वंदे मातरम् असं लिहिलं होतं. वरती 8 सूर्य आणि शेवटच्या पट्टीत 8 सूर्य आणि चंद्रकोर ताऱ्याचं चित्र होतं.
भारताचा पाचवा ध्वज : 1917 मध्ये होम रूल लीगने नवीन ध्वज स्वीकारला. होमरूल लीगची स्थापना बाळ गंगाधर टिळक यांनी केली होती.या ध्वजात वरती फडकावण्याजवळ युनियन जॅक असतो. उर्वरित ध्वजावर पाच लाल आणि चार निळ्या पट्ट्या होत्या. 'सप्तर्षि' नक्षत्राच्या आकारात त्यात सात तारे होते. यात चंद्रकोर चंद्र आणि वरच्या फ्लाय एंडला एक तारा असतो. पण या ध्वजाला जनमानसात लोकप्रियता मिळाली नाही.
भारताचा सहावा ध्वज : 1916 मध्ये पिंगली व्यंकय्या यांनी महात्मा गांधींच्या मंजुरीनंतर दुसऱ्या ध्वजाची रचना केली. पिंगली व्यंकय्या हे लेखक आणि भूभौतिकशास्त्रज्ञ होते. महात्मा गांधींनी त्यांना भारताच्या आर्थिक वाटचालीचं प्रतीक म्हणून ध्वजात चरखा समाविष्ट करण्यास सांगितलं. त्यांनी 'खादी'पासून ध्वज तयार केला आणि त्याला लाल आणि हिरवा असे दोन रंग होते आणि त्यावर 'चरखा' काढला होता. पण महात्मा गांधींनी ते मान्य केलं नाही. त्यांच्या मते, लाल रंगाने हिंदू समाजाचं आणि हिरव्या रंगाने मुस्लिमांचं प्रतिनिधित्व केलं होतं, परंतु भारतातील इतर समुदायांचं प्रतिनिधित्व ध्वजात नव्हतं.
भारताचा सातवा ध्वज : ध्वजाच्या इतिहासात 1931 हे वर्ष महत्त्वाचं आहे. यावर्षी तिरंगा ध्वज आपला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यात भगवा, पांढरा आणि हिरवा या तीन रंगांचा समावेश आहे, ज्यामध्ये मध्यभागी महात्मा गांधींचा चरखा होता.
भारताचा आठवा ध्वज : आधीच्या झेंड्यात 1947 मध्ये थोडे बदल करण्यात आले. संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी तो झेंडा स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला.या झेंड्यात केवळ घडलेला बदल म्हणजे चरखाऐवजी सम्राट अशोकाचं धर्मचक्र राष्ट्रध्वजाचं प्रतीक म्हणून स्वीकारलं गेलं. कालांतराने काँग्रेस पक्षाचा तिरंगा ध्वज स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज बनला.
ध्वज संहितेनुसार, कोणताही भारतीय राष्ट्रध्वज आपण कुठेही आणि कधीही अभिमानाने प्रदर्शित करू शकतो, परंतु तिरंग्याचा अनादर करू नये.