PHOTO : केळी उत्पादक शेतकरी हवालदिल; भाव नाही, व्यापाऱ्यांची मनमानी, घड गुरांसमोर
Nandurbar News Updates : नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीचे (Banana Farming) उत्पन्न घेतले जात असते. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून केळीच्या दराची समस्या मोठ्या प्रमाणात भासत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. केळीला भाव नसल्याने शहादा तालुक्यात शेतकरी आपल्या शेतात असलेलं केळीचे घड जनावरांना टाकत असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे .
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा आणि नंदुरबार तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पन्न घेतले जाते. यावर्षी जिल्ह्यात पाच हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर केळीची लागवड झाली.
केळीला दोन ते तीन रुपये परत प्रति किलो दर मिळत आहे आणि त्यात व्यापारी मनमानी करत आहे. व्यापारी केळीची तोड करण्यासाठी येत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
आता दर मिळत नसल्याने शेतकरी केळीचे घड जनावरांना खाण्यास टाकत असल्याचे समोर आले आहे. मायबाप सरकारने आता तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे ही अपेक्षा आहे, अशी भावना शेतकरी बोलून दाखवत आहेत.
द्राक्ष आणि संत्रीप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केळी प्रक्रिया उद्योग उभारून व्यापाऱ्यांची मनमानी थांबवावी असंही काही शेतकऱ्यांची मागणी आहे.
केळी लागवडीपासून एकरी 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च झालेला आहे. ऐन काढणीच्या वेळी व्यापारी मनमानी करत असतात. त्यात व्यापारी येत नसल्याने केळीचे घड झाडावर पिकत असल्याने प्रशासनाने व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक घेत मार्ग काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अस्मानी संकटाशी सामना करत रक्ताचे पाणी करून तयार झालेल्या केळीच्या खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने सोन्यासारखे पीक मातीमोल होत असल्याचे चित्र आहे. आता तरी शेतकऱ्यांच्या केळी खरेदीसाठी मायबाप सरकारने भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.