Yavatmal News : जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे (Rain) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यामध्ये जवळपास 72 हजार हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळमध्ये झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यात न भरून निघणारी हानी झाली आहे. जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या काठावरील अनेक गावांना पुराचा वेढा बसला. या पुरामुळे बळीराजाचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
सर्वात जास्त नुकसान महागाव तालुक्यात
सर्वाधिक शेतीचे नुकसान हे महागाव तालुक्यात झाले आहे. महागावमध्ये जवळपास 37 हजार 760 हेक्टर शेत जमीन उध्वस्त झाली आहे. महागावच्या लेवा या गावाला पैनगंगा नदीच्या पुराचा वेढा बसला आहे. ऊस, हळद, कापूस, सोयाबीन या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. दरम्यान पुरामुळे वाहून आलेल्या दगडामुळे शेतजमिनींचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. तर आता यामध्ये पीक कसे घ्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.
कोणत्या तालुक्यात किती नुकसान?
यवतमाळ - 26 हजार हेक्टर
दारव्हा - 13 हजार 540 हेक्टर
उमरखेड - 7 हजार हेक्टर
दिग्रस - 5 हजार 700 हेक्टर
नेर - 400 हेक्टर
या तालुक्यांसह वणी आणि झारीजामनी तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अंदाजे जिल्ह्यात एकूण 72 हजार 737 हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यामध्ये एकूण 1 हजार 426 घरांची पडझड झाली आहे.
पक्षपात न करता पुरग्रस्तांना मदत करणार - अनिल पाटील
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या अतिवृष्टीनंतर पूरग्रस्तांना तातडीने मदत पुरवण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रशासनला दिल्या आहेत. तसेच पूरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तात्काळ धान्य वितरण तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे निर्देश अनिल पाटील यांनी दिले आहेत. तर ज्यांच्या शेतपीकांचे नुकसान आणि शेतजमीनींचे नुकसान अशी विभागणी करुन त्याचा अहवाल तयार करण्यास त्यांनी सांगितलं आहे. तसेच ज्यांची शासकीय कागदपत्रे भिजली आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ न देता सर्वांना सरसकट करण्याच्या सूचना मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे. तसचे यामध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपातपणा न करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात झालेल्या नुकसानामुळे शेतकरी आता मोठ्या प्रमाणात संभ्रमात पडले आहेत. तसचे शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पण नुकसान भरपाई जरी मिळाली तरी ती अगदी तुटपुंजी असणार असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता झालेलं नुकसान कसं भरुन काढायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
हे ही वाचा :
तिकडे चिंता मिटवली मात्र मराठवाड्यात वाढवली; औरंगाबाद विभागात फक्त 37.8 टक्के पाऊस