यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात सध्या साथीच्या आजाराने जिल्ह्यात डोकं वर काढल्याचं चित्र आहे. तर आतापर्यंत डेंग्यूने (Dengue) सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आलीये. खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्याने वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची हेळसांड होत असल्याचं चित्र आहे. तर या रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांची पदं देखील रिक्त असल्याचं पाहायला मिळत आहे. 


नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडवानंतर यवतमाळ मधील शासकीय रुग्णालयाचे देखील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे आता प्रशासन यावर देखील कोणती कठोर पावलं उचलणार ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर या रुग्णालयातील प्रसुतीगृहाची स्थिती देखील गंभीर असल्याची बाब उघडकीस आलीये. तर अशीच परिस्थिती  ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी देखील अवस्था सारखीच आहे. 


आरोग्य कर्मचाऱ्यांची पदं रिक्त


यवतमाळ शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, वॉर्ड बॉय यांची एकूण 301 पदं आहेत. पण यामधील 170 पदं रिक्त आहे. तर आध्यपकांची एकूण 148 पदं मंजूर आहेत. पण यामधील 117 पदं कार्यरत असून अजूनही 39 पदे रिक्त आहे.  त्यामुळे यवतमाळ शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याचं चित्र आहे. तर याठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांची आधी रक्त तपासणी केली जाते. त्यानंतर ज्या रुग्णांची अवस्था गंभीर आहे त्यांनाच रुग्णालयात दाखल करण्यात येते. इतर रुग्णांवर प्राथमिक उपचार करुन घरी पाठवले जाते. 


प्रसुतीगृहाची देखील अवस्था बिकट


शासकीय रुग्णालयातील प्रसुतीगृहाची देखील अवस्था बिकट असल्याचं समोर आलं आहे. एका वॉर्डात 39 रुग्णांच्या व्यवस्था होऊ शकते. पण या शासकीय रुग्णालयात 150 रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक एका वॉर्डात राहतात. तर लहान मुलांच्या वॉर्डमध्ये तर एका बेडवर दोन ते तीन रुग्ण असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या अशा परिस्थितीकडे शासनाने आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 


राज्यातील ग्रामीण भागात शासकीय रुग्णालय हे उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. पण त्याच शासकीय रुग्णालयांची परिस्थिती जर अशीच राहिली तर रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे प्रशसानाने यावर कायमस्वरुपी उपाययोजना करुन आरोग्य कर्मचाऱ्यांची पदं देखील लवकरात लवकर भरण्याची मागणी सध्या करण्यात येतेय. 


हेही वाचा : 


नांदेड प्रकरणाची बालहक्क आयोगाकडून दखल, चौकशीतून दोषी निश्चित करण्याचे पोलिसांना आदेश