यवतमाळ: सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) पुन्हा एकदा बरळले असून गांधींजींवर टीका करत नथुराम गोडसेचे (Nathuram Godse) गुणगाण गायलं आहे. गांधीजींचा विचार आता शिल्लक नाही, नथुराम गोडसेची भूमिका प्रत्येक भारतीय काळजात ठेवून आहे असं सदावर्ते म्हणाले. यवतमाळ मधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 


Gunaratna Sadavarte On Mahatma Gandhi : नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? 


महात्मा गांधींवर टीका करताना आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे गुणगाण गाताना सदावर्ते म्हणाले की, "ज्या प्रकारे शरद पवारांच्या विचारांना जसं झोडपून काढलं, तसंच त्यांच्या बगलबच्च्याना झोडपून हाकूलून लावले आहे. अखंड भारताचे भाग्यविधाते नथुरामजी गोडसे यांची भूमिका प्रत्येक भारतीय काळजात ठेवून आहे. गांधीजींचा विचार आता काही शिल्लक राहिलेला नाही. अखंड भारताचा विचार शिल्लक आहेत. पाकिस्तानधार्जिना विचार शिल्लक नाही. म्हणून असे विचार काँग्रेस कधीही संपवू शकणार नाही. शरद पवारांचा विचार सुद्धा नथुरामजी गोडसे यांच्या पायाच्या धुळी इतका सुद्धा नाही."


"आमसभेत शरद पवारांच्या बगलबच्चांनी गदारोळ सोडा, तोंडातून शब्दसुद्धा काढू शकले नाहीत. कष्टकरी जय श्रीराम, वंदे मातरम म्हणत होते. स्वतःला कामगार म्हणून  घेणाऱ्या संघटनेची घाणेरडी कृती आहे. ज्या अहवालावर प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो आहे, ज्या अहवालावरती हिंदू राष्ट्र भारत लिहले, या अहवालाला हात लावण्याचा प्रयत्न केला.  म्हणून संघटनेच्या संदीप शिंदे याला झोडपून बाहेर काढला.", असं सदावर्तेंनी सांगितलं.


विदर्भाच्या मुद्द्यावर इशारा 


वेगळ्या विदर्भाची मागणी अनेक वर्षापासून आहे, आता मात्र वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय राहमार नाही असा निश्चय गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. वेगळ्या विदर्भाच्या आड याल तर या भूमीत तुम्हाला पाय ठेऊ देणार नाही असा इशारा सदावर्तेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना दिला. 


गुणरत्न सदावर्ते यांनी आज वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात उडी घेतली. वेगळ्या विदर्भासाठी आपण आंदोलन उभारणार असल्याचं सांगत त्यांनी नागपूर कराराची होळी केली. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. 


विदर्भाच्या आड येणाऱ्यांना पाय ठेऊ देणार नाही


गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, वेगळ्या विदर्भची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र आता वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही. परिणामी याला विरोध करणाऱ्याला या विदर्भाच्या भूमीत पाय ठेवू देणार नाही.


आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आमसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर 'विदर्भाचा बुलंद आवाज' या परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना गर्भीत इशारा देण्यात आला. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका ही  लपंडावाची असल्याची टीकाही त्यांनी केली.ट


अजित पवारांनी खोडा घातला तर... 


दिवाळीच्या चार दिवस अगोदर एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाचा प्रश्न आणि सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी सदावर्तेंनी केली. जर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोडा घातला तर एकही कर्मचारी स्टेरिंगवर बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. 


या संबंधित बातम्या वाचा: