यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील गोधणी इथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर पेट्रोलिंग सुरु केले होते. पोलिसांनी (Police) पेट्रोलिंग सुरु असताना जुगार खेळणाऱ्यांची एक घाबरगुंडी उडाली. पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकताच जुगार खेळणाऱ्यांची धावपळ सुरु झाली. यामध्ये एकूण सहा जणांचा समावेश होता. यामधील एका युवकाने देखील घाबरुन पळ काढला. त्यामुळे खाली पडून त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येतोय. दिनेश दिहरी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. 


नेमकं काय घडलं?


पोलिसांचं पथक या भागात गस्त घालत असताना या भागात काही युवक गोंधळ करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गोधनी येथील जुगार अड्ड्यावर गस्त घालण्यास सुरुवात केली. पोलिसांची चाहूल लागताच या तरुणांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत दिनेशने देखील घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्याच्या घराकडे पळ काढण्यास सुरुवात केली. तर काही अंतरापर्यंत धावत गेल्यानंतर दिनेश हा पोलिसांना आणि गावकऱ्यांना खाली पडलेला दिसला. पोलिसांनी तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. 


दिनेशचा मृत्यू झाल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी दिनेशचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. तर हा सगळा नेमका प्रकार काय हे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट होणार असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांनी म्हटलं आहे. तर पोलिसांच्या मारहाणीतच दिनेशचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून यामध्ये किती तथ्य आहे हे देखील तपासण्यात येईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 


तर बाकी जे लोक पळून गेले आहेत त्यांच्यावर देखील योग्य करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. तसेच यवतमाळमध्ये सध्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांमुळे अनेक तरुण यामध्ये वाहावत चालल्याचं चित्र सध्या आहे. त्यामुळे अशा लोकांसाठी प्रशासनाने कठोर नियमावली करावी अशी मागणी सध्या नागरिकांकडून करण्यात येत आहे. 


तर दिनेशच्या बाबतीत जे घडलं ते जिल्ह्यातील इतर तरुणांच्या बाबतीत घडण्याची भीती नागरिकांना वाटू लागली आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेचा पोलिसांनी लावावा अशी मागणी सध्या जोर धरु लागली आहे. तर यावर पोलीस प्रशासनाकडून कोणती कारवाई करण्यात येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा :