यवतमाळ : घरगुती वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाने दगडाने ठेचून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये (Yavatmal) घडली आहे. घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या झटाळा गावात गुरुवारी (17 ऑगस्ट) सकाळी हत्येची घटना घडली. शालीक खेत्रू मसराम (वय 50 वर्षे) असं मृताचं नाव आहे. तर मारोती खेत्रु मसराम (वय 42 वर्षे) असं आरोपी लहान भावाचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरुन वाद


मृत शालिक मसराम व मारोती मसराम या दोघांचा वाद सुरु झाला. आरोपीची पत्नी माहेरी गेली होती. ती नांदायला येत नसल्याच्या कारणावरुन दोन भावांमध्ये वाद झाला. "तुझ्यामुळे माझी पत्नी घर सोडून गेली, माझा परिवार तुझ्यामुळे उद्ध्वस्त झाला आहे. तूच कारणीभूत आहेस," असं म्हणत दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी मारोतीने शालीकच्या डोक्यात दगडाने वार केला यात तो जागीच कोसळला. तर मारोती घराबाहेर निघून गेला. हा प्रकार पाहून गावकऱ्यांनी जखमी शालीकला उपचारांसाठी घाटंजी रुग्णालयात नेतं. परंतु तिथे तपासणी करुन डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.


या प्रकरणी मृत शालीक मसरामच्या पत्नीने पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरता रुग्णालयात पाठवला. तर मारेकरी मारोती मसरामविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. घाटंजी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.


दोन चिमुकल्यांना विष पाजून आईनेही आयुष्य संपवलं


दुसरीकडे चार दिवसांपूर्वी उमरखेड तालुक्यातील निंगणूर इथे आईने आपल्या दोन चिमुकल्यांना विष पाजून स्वतःचंही आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली होती. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे खळबळ उडाली होती. रेश्मा नितीन मुडे (वय २६ वर्षे), श्रावणी नितीन मुडे (वय ६ वर्षे) आणि सार्थक नितीन मुडे (वय ३ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी (14 ऑगस्ट) संध्याकाळी सहाच्या सुमारास रेश्मा मुंडे यांनी आपल्या दोन्ही मुलांना विष पाजलं आणि त्यानंतर स्वतः विष प्राशन करुन आयुष्य संपवलं. माहेरातून पैसे आणण्यासाठी पती सतत त्रास देत असल्याने छळाला कंटाळून रेश्मा मुडे यांनी आपल्या दोन मुलांसह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. 


हेही वाचा


Yavatmal Crime News: आधी पत्नीची हत्या मग पतीचे अपहरण, यवतमाळच्या पुसदमधील धक्कादायक घटना समोर