Yavatmal Crime News: दारू विक्रीच्या जुन्या वादातून एका 30 वर्षीय तरुणाची मित्रांनीच हत्या केल्याची धक्कादायक घटना (Crime News) शहरातील पिंपळगाव मार्गावर असलेल्या  परिसरातील शेतात घडली. पंकज उर्फ लल्ला कराळे (30 रा. बांगर नगर ) यवतमाळ (Yavatmal News) असे मृत तरुणाचे नाव आहे याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.


यवतमाळ शहरातील पिंपळगाव मार्गावर पंकज उर्फ लल्ला कराळे याचे लल्ला नावाने चिकन सेंटर आहे. याचबरोबर तो अवैधरित्या दारूचा व्यवसाय करीत होता. या अवैध दारू विक्रीच्या कारणावरून त्याचा पूर्वी मित्रांसोबत वाद झाला होता. यावेळी  दोघांमध्ये अवैध दारूचा विक्रीचा व्यवसाय सुरू झाला. त्याचबरोबर  दोघांमध्ये अध्येमध्ये खटके उडत होते. अशात सोमवारी सायंकाळी लल्ला याचे मित्र अप्सरा टॉकीज परिसरातील एका वाईन शॉपमधून विदेशी दारू घेऊन लल्ला याच्या दुकानासमोर आले. त्यानंतर लल्लाला घेऊन मित्र त्याच्या दुकानासमोर असलेल्या एका डेरी परिसरातील शेतात गेला. यावेळी मित्रासह त्यांनी मद्यप्राशन केले. काही वेळातच लल्ला याच्यासोबत मित्रांनी वाद घातला. 


रागाच्या भरात लल्लावर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळतात परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच शहर आणि लोहारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. 


घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलिस अधीक्षक पियूष जगताप यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा पोलिस करीत आहेत. या खून प्रकरणात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.


आतापर्यंत 9 दिवसात 6 हत्या


नववर्षाच्या पहिल्याच दिवशी यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली. तर दुसऱ्या घटनेत बाभुळगाव तालुक्यातील दाभा येथे सावत्र बापाने मुलाची हत्या केली. या घटनेची शाई वाळत नाही, तर यवतमाळ शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेल्या स्मशानभुमीसमोर खूनाची तिसरी घटना घडली असून यात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी जुन्या वादातून मित्राने मित्राची हत्या केल्याची बाब समोर आली असून लोहऱ्यात गुन्ह्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.