Ambadas Danve on Bjp: ''भाजपला पक्ष फोडण्याची सवयच आहे. यापूर्वीही मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्येही केले. स्वतःचा पक्ष वाढत नाही तर इतर पक्ष फोडण्याचा काम भाजप करते. फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे'', शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत. यवतमाळ येथे आक्रोश मोर्च्यात ते असं म्हणाले आहेत. ते म्हणले आहेत की, ''सुरुवातीला भाजपने महाराष्ट्रात मी नाही त्यातली असे दाखवले. स्वतः आता फडणवीस यांनी सांगितले की, मी त्यांना फोन केला आणि आता तर स्वतः फडणवीस यांच्या पत्नी सांगत होत्या की हे वेशांतर करून भेटण्यासाठी जात होते. त्यामुळे यात भाजपचा सहभाग असल्याचे स्पष्ट होते.''
मुंबई पालिकेच्या निवडणुकीबद्दल बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, ''मुंबईचा विकास शिवसेनेने चांगल्या पद्धतीने साधलेला आहे. मुंबईची पावसाळ्यात नेहमी तुंबत होती. ठाणे, नागपूर पावसाळ्यात तुंबल, मात्र मुंबई सुरक्षित राहिली. याला एकच कारण की महानगरपालिकेत शिवसेनेने केलेलं काम. आजही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेलं काम याला कोणीही थांबू शकत नाही. आता शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत फक्त उपभोग घेणे सुरू आहे. अवाढव्य पणे खर्च करणे चालू आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आणणे चालू आहे. याचा धडा मुंबईकर हे यांना निवडणुकीत शिकवणार आहेत.''
''केंद्र सरकार शेतकऱ्यांचा गळा कापून व्यापाऱ्यांचे हित साधते''
केंद्र सरकारवर हल्लाबोल करत अंबादास दानवे म्हणाले, ''ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करण्याचं धोरण हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत चुकीचं आहे. देशातच मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होते, तरीही कापूस आयात करावा लागतो. केवळ टेक्सटाईल उद्योगांना मदत करण्यासाठी हे आयात धोरण आहे. केंद्र सरकार हे व्यापाऱ्यांचे उद्योजकांच्या हिताचे आहे.'' ते पुढे म्हणाले, ''शेतकऱ्यांचा हंगामातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कापसाला भाव या मागणीचा इतर मागण्यांसाठी हा आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. केंद्र शासनाचा आयात निर्यात धोरण हे शेतकऱ्यांच्या जीवावर उठत आहे. केंद्र शासन उद्योजकांना व्यापाऱ्यांना सपोर्ट करते, म्हणून हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सीसीआय आणि कापूस फेडरेशनचे कापूस खरेदी केंद्र हे तातडीने सुरू झाले पाहिजे. शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत झाला पाहिजे, शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे, अतिवृष्टीची मदत तातडीने मिळाली पाहिजे, यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.''