Yavatmal News: यवतमाळ : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरु केलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange) लढ्याला अखेर आज यश आले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने अध्यादेश काढला आहे. दरम्यान, या विजयानंतर राज्यभरात सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जातोय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, याकरिता जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्याचा आनंद आणि समाधान असल्याची प्रतिक्रिया मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली. आज यवतमाळ (Yavatmal News) येथे त्या बोलत होत्या.
कायद्याच्या चौकटीत टिकणारे आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण मिळावं, अशी सरकारची भूमिका होती. त्यादृष्टीने निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या प्रदीर्घ संघर्ष आणि लढ्याला आज अखेर यश आले असल्याचे देखील अदिती तटकरे म्हणाल्या.
मराठा समाजाचा संघर्ष सुरूच
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी प्रलंबित होती. सरकारने 2012- 2013 मध्ये पहिल्यांदा कायदा करण्यात आला होता. त्यानंतर 2014 आणि नंतर मधल्या काळामध्ये देखील या संबंधित पावले उचलली गेली होती. मात्र कोर्टात हा कायदा फार काळ टिकू शकला नाही. पण मराठा समाजाचा सातत्याने संघर्ष हा सुरूच होता. आज मी सबंध मराठा समाजाचे या निमित्ताने अभिनंदन करेल, सर्व समाजबांधवांना शुभेच्छा देईल.
खर तर राज्य सरकारची असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असो, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही नेहमीच आमची भूमिका राहिलेली आहे. कायद्याच्या चौकटी टिकणार आणि कुठल्याही इतर घटकांच्या आरक्षणाला धक्का न लागता ते आरक्षण मराठा समाजाला निश्चितपणाने मिळावं ही आमची देखील आग्रही मागणी होती, असे देखील अदिती तटकरे म्हणाल्या.
निर्णयाचे आनंद आणि समाधान
मराठा समाज सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनाच्या माध्यमातून प्रदीर्घ लढा दिला आहे. मधल्या कालावधीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यामातून संबंध समाजाने आरक्षणाची मागणी लावून धरली होती. आज त्यांच्या अनेक मागण्या त्या ठिकाणी पूर्ण होत असताना राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अजित दादा असतील या सर्वांचीच मिळून ही भूमिका होती की, समाजाला आरक्षण आणि त्यांचे विविध प्रश्न हे सुटले पाहिजेत. ते आज राज्य शासनाच्या माध्यमातून होत असताना निश्चितपणाने त्याचा आनंद आणि समाधान असल्याचे देखील अदिती तटकरे म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या