Yavatmal News : राजधानी दिल्लीत राजपथावर (Rajpath) उद्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2023) अर्थात 26 जानेवारी रोजी होणाऱ्या पथसंचलनात (Parade)'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ चित्ररथ दिसणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या (Tableau) देखाव्यावरील संपूर्ण शिल्प (Sculpture) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात तयार करण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळचे नाव राजधानी दिल्लातही कोरले जाणार आहे.
प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे. शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्ह्यातील कलावंतांनी या चित्ररथातील शिल्प साकारले. चित्ररथाची पहिली झलक कर्तव्यपथावरील (दिल्ली) तालमीमध्ये अवघ्या देशाला पाहायला मिळाली. चित्ररथ साकारणाऱ्या कलावंतांमध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील कलावंतांचा मोठा वाटा आहे.
शूर स्त्रियांच्या प्रतिकृती देखील चित्ररथात
'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावरील राज्याच्या चित्ररथामध्ये महाराजांचे लोकशाहीला अनुसरून असलेला राज्यकारभार अधोरेखित करण्यात आला आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात बाल शिवाजींसह माँ जिजाऊंची प्रतिकृती पाहायला मिळाली. तर, मागे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, न्यायाचा प्रतीक तराजू, संभाजी महाराज कामकाजात सहभागी महिला, गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलांची दखल घेणारे महाराज आदी दृश्य आहे. सोबतच, हिरकणी, दिपाऊ बांदल, सावित्री देसाई, सोयराबाई, कल्याणच्या सुभेदारांची सून अशा शिवकालीन शूर स्त्रियांच्या प्रतिकृती देखील चित्ररथात आहे.
यवतमाळच्या स्टुडिओमध्ये साकारले शिल्प
चित्ररथ साकारताना तुषार प्रधान (यवतमाळ) आणि रोशन इंगोले (वर्धा) यांनी कला दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली. तर, यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध शिल्पकार यशवंत एनगुर्तीवार (पाटणबोरी, जि. यवतमाळ) शिल्पकला विभागाचा प्रमुख आहे. त्याच्या समुहामध्ये भूषण हजारे (कळंब) सूरज गाऊत्रे (सोनबर्डी, ता. केळापूर), पिंटू भोंग (पहापळ, ता. केळापूर), नितेश बावणे (घाटंजी), अक्षय बावणे, योगेश वहिले, अविनाश बावणे, निखिल दूर्षेट्टीवर, अरुण मेश्राम, सुमीत कानके (सर्व रा. पाटणबोरी) आदी शिल्पकारांचा समावेश आहे. पाटणबोरी येथे यशवंत यांच्या स्टुडिओमध्ये या चित्ररथातील शिल्प साकारले आहे.
विविध मंत्रालयांचे चित्ररथ
26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि मजबूत अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा यांचं दर्शन घडवणारी राज्यांची, केंद्रशासित प्रदेशांची आणि विविध मंत्रालयांचे चित्ररथ दिसतील.
हे ही वाचा :
Republic Day Parade : दिल्लीत झळकणार शिवराज्याभिषेकाचा सोहळा; प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ