यवतमाळ : पक्षाने आदेश दिला तर आपण अकोट विधानसभा निवडणूक लढू असं वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं. यवतमाळमधील सातपैकी तीन जागांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडून करणार असल्याचंही ते म्हणाले. अमोल मिटकरी हे यवतमाळच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं.
सध्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गुलाबी रंगातील जॅकेटमध्ये दिसतात. त्यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, गुलाबी रंग लोकांना आवडतो तो रंग लोकांना आकर्षित करतो म्हणून सध्या तो रंग वापरला जातोय. कुठल्या बाबा बुवाचा ऐकून तो रंग वापरला जात नाही.
जयंत पाटील यांना त्यांच्याच पक्षात किती त्रास होतोय हे त्यांच्या वेदनेवरून समजून घेत आहोत. सध्या तुतारी गटाचा एक नवीन युवक नेतृत्व करायला लागलाय आणि त्याचा जयंत पाटील यांना त्रास होतोय. त्यांच्या मनस्थितीतून त्यांच्याकडून वेगवेगळी वक्तव्यं केली जातात असं अमोल मिटकरी म्हणाले. जयंत पाटील यांची सध्याची वक्तव्यं पाहता ते महायुतीत येण्याचे संकेत आहेत का असा प्रश्न पडतोय असंही मिटकरी म्हणाले.
महायुतीतील आमदार नितेश राणे हे वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांना त्यांच्या पक्षाने रोखायला पाहिजे असं अमोल मिटकरी म्हणाले. अनेकदा याबाबत गोची होते, मात्र सांगणार कुणाला असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलंय.
शरद पवार गटाकडून नारेबाजी
अमोल मिटकरी हे यवतमाळ विश्रामगृहात आले असता त्यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली. त्यावर अमोल मिटकरी म्हणाले की, की नारेबाजी करण्याऐवजी त्यांनी भेटून जर निवेदन दिले असेल तर बोलता आलं असतं. आम्ही बेवफा असेल तर तुम्ही वफा सिद्ध करायला हवी. आम्ही बोलायला बसलो तर खूप काही निघेल. 2014 मध्ये न विचारता पाठिंबा कसा दिला?
यवतमाळमधील तीन जागांची मागणी
यवतमाळ जिल्ह्यातील सात पैकी तीन जागांची मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून केली जात आहे. त्यामध्ये दिग्रस आणि पुसद या विधानसभेचा समावेश असल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली. जिथे राष्ट्रवादी मजबूत आहे तिथं जागा मागणार असं अमोल मिटकरी म्हणाले.