Climate Change : हवामान बदलावर कार्य करणारी स्वीडिश कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg) पर्यावरण आणि हवामान बदलासंबंधी नुसत्याच बढाया मारणाऱ्या आणि पोकळ आश्वासनं देणाऱ्या जगभरातील सत्ताधाऱ्यांना चांगलंच सुनावलं. मानवाला रहायला दुसरा ग्रह नाही, विकसित देश हवामान बदलासंबंधी गरीब देशांना मदत करण्यामध्ये मागे राहतात, ते नुसतंच बढाया मारतात अशी टीका ग्रेटा थनबर्गने केली आहे. इटलीमध्ये 'युथ फॉर क्लायमेट' या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन या विषयावर तिने हवामान बदलाच्या संकटावर पोकळ आश्वासनं देणाऱ्या नेत्यांना चांगलंच सुनावलं. (Greta Thunberg blasts leaders climate inaction).


नोव्हेंबरमध्ये इटलीतील ग्लासगो या ठिकाणी COP26 परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी संयुक्त राष्ट्राची हवामान बदलासंबंधी एक उच्च स्तरीय बैठक होणार आहे. त्या आधी युथ फॉर क्लायमेट या परिषदेचे आयोजन करण्यात आलं असून त्यामध्ये ग्रेटा थनबर्ग तसेच हवामान बदलावर कार्य करणारी कार्यकर्ती वनेसा नकॅते (Vanessa Nakate) यांनी भाग घेतला आणि या विषयावर केवळ पोकळ आश्वासनं देणाऱ्या जगभरातील नेत्यांवर टीका केली. 


विकसित देशांनी हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी विकसनशील देश आणि मागासलेल्या देशांना मदतीचे आश्वासन पूर्ण केलं नाही, त्यांना आर्थिक मदत केली नाही. या विषयावर ते केवळ पोकळ आश्वासनं देतात आणि आपण पूर्ण न केलेल्या आश्वासनांबद्दल एकमेकांचे आभार मानतात अशी टीका ग्रेटा थनबर्गने केली आहे. 


ग्रेटा थनबर्ग म्हणाली की, "ग्रीन इकॉनॉमी, 2050 पर्यंत नेट झिरो, क्लायमेट न्यूट्रल हे असे अनेक शब्द वापरुन जगभरातील नेते बढाया मारतात. या गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात, पण त्याच्यावर कोणतंही काम होत नाही. आमच्या आशा आणि स्वप्न ही या नेत्यांच्या पोकळ बढायांमध्ये बुडाल्या. हवामान बदलावर आपल्याला काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं पाहिजे. या नेत्यांकडे त्यावर आश्वासनं देण्यासाठी अजून 30 वर्षे आहेत आणि आपण त्यामागे फरफटत जात आहोत."


 






वनेसा नकॅते म्हणाली की, "जगभरातील नेते हे आपण येत्या काळात नेट झिरोचे ध्येय साध्य करण्यासाठी काय करत आहोत यासाठी कॉन्फरन्स घेतात. पण या पोकळ कॉन्फरन्सपेक्षा कृती करण्याची, आर्थिक मदत करण्याची वेळ आली आहे. हवामान बदलाचा बळी पडलेल्या, सर्वाधिक परिणाम झालेल्या मागास देशांतील लोकांची या प्रश्नावर भूमिका काय आहे हे जाणून घ्यायला विसरू नका."


महत्वाच्या बातम्या :