मुंबई : निसर्ग कोपला की तो कसं तांडव करतो हे गेल्या काही वर्षात जगानं पाहिलंय. विशेषत: निसर्ग रचनेतल्या मानवी हस्तक्षेपामुळे त्याच्या रौद्र रुपाचा जगभरातल्या महानगरांना फटका बसलाय. भारतातली, युरोपातली आणि चीनमधली महानगरं सध्या एकाचवेळी महापुरांच्या विळख्यात सापडली आहेत. विदेशातल्या अनेक शहरांनी वातावरण बदलांशी स्वत:ला जुळवून घेतलंय. मात्र, नव्या वातावरण बदलांना सामोरे जायला शहरं तयार आहेत काय? 


इंग्लंडची राजधानी लंडन, चीनमधलं हेनान आणि भारतातली महानगरं ही एकाच वेळी निसर्गाच्या रौद्र रुपाला सामोरी जातायेत. सध्या महाराष्ट्रात पश्चिम घाटावर निसर्गाच्या रौद्र रुपानं थैमान घातलंय. पश्चिम महाराष्ट्र, कोकण , विदर्भ आणि राजधानी मुंबई सातत्यानं वातावरण बदलामुळे निर्माण झालेल्या संकटांना सामोरी जातेय.


मुंबई
मुंबई ही 7 बेटांपासून बनवली आहे. मुंबईत बशीच्या आकाराचे बेटं तयार झालीत. अशातच उंच भागातून सखल भागात पाणी जातं आणि म्हणूनच मुंबईच्या रस्त्यांचा दरवर्षीच समुद्र होतो. पण ही झाली मुंबईची भौगोलिक रचना. मात्र, दरवर्षी मुंबईत होणाऱ्या दुर्घटनांसाठी मानवी हस्तक्षेपही तितकाच जबाबदार आहे. तुलनाच करायची झाली तर ती लंडनच्या थेम्स नदीची आणि मुंबईतल्या मिठी नदीची होईल. एकीकडे लंडनमध्ये थेम्स नदीचं पाणी शहरात शिरायचं म्हणून तिथे थेम्सची खोली वाढवली गेली. मुंबईत मात्र मिठी नदीचं आहे तेवढं पात्रही अरुंद होत चाललंय आणि मिठी नदीचा नाला झालाय.


पुणे
पुणे हे मूळ टेकड्यांचं आणि मुळा-मुठेसोबतच लहानमोठ्या ओढे आणि ओहोळांचं शहर. मात्र, बेसुमार काँक्रिटीकरणानं पुण्यात नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बुजवण्यात आलेय. आंबील ओढा हे त्याचं जिवंत उदाहरण. शहर वसवण्यासाठी नैसर्गीक ओढे-ओहोळ यांवर अतिक्रमण झालं.


कोल्हापूर
पंचगंगेची दरवर्षी वाढणारी पातळी ही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठीच धोक्याची घंटा आहे. पंचगंगेच्या रेडझोनमध्ये बेसुमार बांधकामं झालीयेत. माणसानं स्वत:चं घर नदीच्या घरात बांधलं आणि आता नदी तितं घर सोडून जागा मिळेल तिथे निघालीय. कमी वेळात होणाऱ्या जास्त पावसानं पंचगंगा फुगते आणि तिच्या लगतचा पुणे-बंगरुळु महामार्गावरही पावसाळ्यात दिसेनासा होतो.


सांगली
कोयना धरणाची पातळी किती ठेवायची याबाबत जलआयोगाचे काही विशीष्ट निर्देश आहेत. मात्र, कोयनेतून होणाऱ्या वीजनिर्मीतीच्या हव्यासापोटी आणि जादा पाणीसाठ्यासाठी कोयना धरणातून योग्य वेळीच विसर्ग केला जात नाही. आणि वातावरण बदलामुळे जेव्हा कमी वेळात जास्त प्रमाणात पाऊस होतो तेव्हा कोयना धरणातली पाणी पातळी वाढते आणि नाईलाजानं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करावा लागतो...


नागपूर
काही वर्षांपूर्वी नागपूरमध्ये फारशी पाणी साचण्याची उदाहरणं पाहायला मिळत नव्हती. गेल्या काही वर्षात नागपूरमध्ये विकासाचा पाठलाग करतांना मोठ्या संख्येनं  सिंमेंटचे रस्ते तयार झाले. कोणत्याही शहराच्या विकासासाठी चांगले रस्ते आवश्यक असतातच. मात्र, या रस्त्यांचा आराखडाही स्थानिक भौगोलिक परिस्थितीशी समतोल साधणारा असावा लागतो. नागपुरात हाच समतोल साधला गेला नाही...त्यामुळेच, आजुबाजूच्या वस्तीपेक्षा रस्त्यांची उंची जास्त झाली आणि शहरात पाणी साचायला मदत झाली.


नाशिक 
गोदावरीला दरवर्षीच पूर येतोय. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झाला तर गोदावरीला पूर येणारच, मात्र त्या विसर्गाचं नीट नियोजन झालं नाही तर 2008 सारखी पूरस्थिती उद्भऊ शकते.सोबतच, गोदावरीच्या पात्रातले नैसर्गिक स्त्रोत हे सिमेंट काँक्रिटीकरणानं दाबले गेलेत. त्यामुळे गंगापूर धरणापासून ते तपोवनापर्यंत गोदावरीतला गाळ काढून उथळ झालेलं पात्र खोल करण्याची गरज आहे.


महाराष्ट्रातल्या महानगरांना जर वातावरण बदलांमुळे निर्माण होणाऱ्या संकटांना खंबीरपणे तोंड द्यायचं असेल तर त्यासाठी दीर्घकालिन नियोजन आवश्यक आहे.महानगरं निर्माण करताना केवळ विकासाचा हव्यास डोळ्यासमोर ठेऊन चालणार नाही. जर हा विकास शाश्वत आणि निसर्गस्नेही राहिला तरच महानगरं येणाऱ्या काळात तग धरु शकतील.