SCO Summit 2022: अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (US Parliament Speaker Nancy Pelosi) यांच्या तैवान भेटीपासून सुरू झालेला चीन (China) आणि अमेरिका (US) यांच्यातील वाद, अशातच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (XI Jinping) 15 आणि 16 सप्टेंबर रोजी SCO शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी  उझबेकिस्तानच्या शहरातील समरकंद येथे पोहोचणार असल्याची माहिती मिळत आहे. इथे जिनपिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन एकाच व्यासपीठावर दिसतील. तर, पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ प्रथमच SCO शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.


पुतिन आणि जिनपिंग यांच्या भेटीवर उमटणार तिखट प्रतिक्रिया
SCO शिखर परिषदेदरम्यान होणारी ही बैठक मोठी मानली जात आहे कारण ही बैठक अमेरिकेला चीन आणि रशियाचा संदेश देखील असेल. एकीकडे युक्रेनवरील लष्करी हल्ल्यामुळे रशिया अमेरिकेसमोर उभा ठाकला आहे, तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हेही तैवानवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या अध्यक्षांची भेट घेऊन अमेरिकेला आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. पुतिन आणि जिनपिंग यांच्या या भेटीवर अमेरिकेतूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात.



पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींसमोर
पंतप्रधान मोदी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत. तसेच गलवान खोऱ्यावरून भारत-चीन संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावादरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक देखील होऊ शकते. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील SCO परिषदेत सहभागी होणार आहेत, त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ एकाच छताखाली येण्याची ही पहिलीच वेळ असेल. अशा स्थितीत दोन्ही नेत्यांमध्ये भेट होते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पंतप्रधान मोदींनी शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन पत्र पाठवले होते आणि ट्विटरवर शुभेच्छाही दिल्या होत्या.


SCO शिखर परिषद 15-16 सप्टेंबरला होणार
SCO प्रमुखांच्या राज्य परिषदेची 2022 ची वार्षिक शिखर परिषद 15-16 सप्टेंबर रोजी समरकंद येथे होणार आहे. उझबेकिस्तानने 17 सप्टेंबर 2021 रोजी ताजिकिस्तानमधून संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले. प्रदेशात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करणे, गरिबी कमी करणे आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे यावर या परिषदेत चर्चा होण्याची शक्यता आहे. भारतासोबत SCO शिखर परिषदेत सहभागी होण्यापूर्वी पाकिस्तान आपली भूमिका शांततेत घेत आहे. शाहबाज शरीफ समरकंद येथे होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेपूर्वी भारताच्या निकटवर्तीयांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.