Finland PM Sanna Marin : फिनलँडच्या (Finland) पंतप्रधान सना मरिन (Sanna Marin) यांनी अंमली पदार्थ चाचणी केली आहे. पुढील आठवड्यात या ड्रग्ज टेस्टचा (Drugs Test) अहवाल येईल. आपल्या मित्रांसोबतच्या एका पार्टीमध्ये बेभान होऊन नाचतानाचा फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला होता. यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर अंमली पदार्थ सेवन केल्याचा आरोप केला. फिनलँडमध्ये या व्हिडीओवरुन चांगलाच गदारोळ झालेला पाहायला मिळाला. अनेकांनी सना मरिन यांच्या डान्सवर टीका केली. पंतप्रधान सना मरिन यांनी पार्टीवेळी ड्रग्जचे सेवन केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.
सना मरिन यांचा पार्टीतील व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये सना मरिन या डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या मित्रांचा समावेश आहे. त्यामध्ये एक सेलिब्रेटीही दिसतोय. हे सर्वजण गाताना आणि नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन मरिन यांच्या राजकीय विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे. मरिन यांनी या पार्टीच्या वेळी ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप विरोधकांनी केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली आहे. देशामध्ये अनेक मूलभूत प्रश्न असताना पंतप्रधान पार्टीमध्ये आणि ड्रग्जमध्ये व्यस्त असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
विरोधकांचे आरोप सना मरिन यांनी फेटाळले
विरोधकांच्या या टीकेवर उत्तर देताना सना मरिन यांनी आपण ड्रग्जचे सेवन केलं नसल्याचं स्पष्ट केलं. या पार्टीवेळी आपण फक्त दारुचे सेवन केलं होतं आणि बेभान होऊन नाचल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान सना मरिन यांनी पार्टीवेळी ड्रग्जचे सेवन केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.
सना मरिन जगातील सर्वात तरुण पंतप्रधान
सना मरिन या जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे पार्टी प्रेम हे जगजाहीर असून या आधी त्यांनी अनेक पार्टीमध्ये भाग घेतल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. सना मरिन या गेल्या वर्षी कोव्हिडची लागण झाल्यानंतरही क्लबमध्ये गेल्या होत्या. त्यावेळीही त्यांच्यावर टीका झाली होती. त्यावर त्यांनी देशाची माफीही मागितली होती.
सना मरिन यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ हा गेल्या आठवड्यातील असल्याचं स्पष्ट झालं आहे. आपण नाचताना आपले शूटिंग होत असल्याचं त्यांना माहिती होतं, पण हा व्हिडीओ लिक झाल्याने आपल्याला वाईट वाटल्याचं त्या म्हणाल्या. मी नाचले, गाणं म्हटलं, पार्टी केली या गोष्टी कायदेशीर आहेत. त्यावेळी माझ्या ओळखीचे सर्व लोक होते, अनोळखी कोणीच नव्हतं असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सना मरिन या 2019 पासून फिनलँडच्या पंतप्रधान आहेत. सध्याच्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमुळे त्यांची आणि त्यांच्या पक्षाची लोकप्रियता कमी होण्याची शक्यता काही माध्यमांनी वर्तवली आहे.