World Vada Pav Day 2022 : आज आहे जागतिक वडापाव दिन (World Vada Pav Day 2022). गरमागरम तेलातून काढलेला, कुर्रकुरीत, थोडा लुसलुशीत आणि चविष्ट असलेला वडा जेव्हा पावात जातो त्यावर हलकीशी लसणाची चटणी तसेच तिखट चटणी आणि मिरचीबरोबर हा वडापाव (Vada Pav) जेव्हा तोंडात जातो. तेव्हा अर्थातच त्याची चव दिवसभर जीभेवर रेंगाळल्याशिवाय राहात नाही. हे वडापावचं वर्णन फक्त वाचूनच तुमच्याही जीभेला पाणी सुटलं असेल. खवय्येप्रेमी बाजूला रस्त्याने जाताना केवळ वासावरून त्या वडापावची चव ओळखतात. इतकंच काय तर, मुंबईतला हा वडापाव परदेशातही प्रसिद्ध झाला आहे. मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. आनंदाच्या क्षणी असो वा दुखाच्या क्षणी, पोटाची भूक भागविण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव. मुंबईतला हाच वडापाव आज जगभर साजरा केला जातोय. या निमित्ताने वडापावची सुरुवात नेमकी कशी झाली ते जाणून घ्या. त्याचबरोबर मुंबईतील प्रसिद्ध वडापाव कुठे मिळतात हे ही या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


अशी झाली मुंबईत वडापावची सुरुवात : 


वडापावचा जन्म साधारण 1966 च्या दशकातला. असे मानले जाते की, मुंबईच्या दादर रेल्वेस्टेशनबाहेर अशोक वैद्य यांच्या गाडीवर पहिल्यांदा वडापाव बनवला गेला. त्याचदरम्यान, दादर मधील सुधाकर म्हात्रे यांनी वडापावची सुरुवात केली. फक्त बटाट्याची भाजी आणि चपाती खाण्याऐवजी भाजीचा गोळा बेसनात घोळवून तळून पावासोबत खाल्यास अधिक स्वादिष्ट लागतो हे लक्षात आल्यानंतर वडापावची खरी सुरुवात झाली. त्यानंतर मुंबईची खरी ओळख असलेल्या वडापावची परंपरा सुरु झाली आणि हा खाद्यसंस्कृतीचा एक भाग बनला.    


कमी किंमतीत पोट भरणारा आणि मनसोक्त आनंद देणारा हा वडापाव अल्पावधीतच लोकप्रिय झाला. मुंबईत वडापावची सुरुवात झाली तेव्हा त्याची किंमत अगदी 10 पैसे इतकी होती.


ही आहेत मुंबईतील प्रसिद्ध वडापावची प्रसिद्ध ठिकाणं : 


1. अशोक वडापाव (किर्ती कॉलेज वडापाव) : मुंबईच्या किर्ती कॉलेजच्या अगदी समोर अशोक वडापाव सेंटर आहे. हा वडापाव मुंबईतील प्रसिद्ध वडापावपैकी एक आहे. या ठिकाणचा चुरा पावही फार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे अनेक सेलिब्रिटीही या ठिकाणी येऊन या वडापावचा आस्वाद घेतात.


2. भाऊचा वडापाव : मुंबईतील फेमस वडापाव सेंटर म्हणजे भाऊचा वडापाव. या वडापावची खासियत म्हणजे आलं आणि नारळाची चटणी. पाटील भवन, एन. एस. रोड, स्टेशन रोड मुलुंड (पश्चिम) या ठिकाणी हा वडापाव खाण्यासाठी अनेक ठिकाणांहून लोक येतात.  


3. आनंद वडापाव : मुंबई प्रसिद्ध कॉलेजपैकी एक म्हणजे मिठीबाई कॉलेज. या कॉलेजच्या खाऊगल्लीत मिळणारा आनंद वडापाव अनेकांचं लक्ष वेधून घेतो. हा वडापाव खाण्यासाठी तरूणाईची तर गर्दी असतेच पण त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटींनाही इथला वडापाव खाण्याचा मोह आवरत नाही. 


4. सम्राट वडापाव : विलेपार्ले येथे मिळणारा सम्राट वडापावही फार प्रसिद्ध आहे. या वडापावची खासियत म्हणजे यामध्ये तुम्हाला वडापावबरोबरच मिक्स भजींचाही आस्वाद घ्यायला मिळतो. हा वडापाव खाण्यासाठी लांबून लोक येथे भेट देतात. 


5. मंचेकर वडापाव : जांबोरी मैदानाच्या अगदी समोर हा मंचेकर वडापाव मिळतो. या वडापावला कायमच ग्राहकांची मोठी पसंती असते. 


6. सारंग बंधू वडापाव (प्रभादेवी) : प्रभादेवीतील Century Bazaar येथे यांचा हा स्टॉल आहे. गरमागरम वडा आणि झणझणीत चटणी यांमुळे खूप फेमस आहे.


मुंबई आणि मुंबई व्यतिरिक्त इतरही काही ठिकाणी प्रसिद्ध वडापाव मिळतात. जसे की, घाटकोपर पूर्व भागात मिळणारा लक्ष्मण वडापाव, ठाण्यातील गजानन वडापाव, ग्रॅज्युएट वडापाव या ठिकाणी वडापाव खाण्यासाठी खवय्यांची गर्दी पाहायला मिळते. 


महत्वाच्या बातम्या :