World TB Day :  24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेकडून आजच्या दिवशी जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. त्या माध्यमातून या जीवघेण्या आजारापासून जगभरातल्या लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली जाते. 24 मार्च 1882 साली जर्मन फिजिशियन आणि मायक्रोबायोलॉजिस्ट रॉबर्ट कोचने या जीवघेण्या आजाराच्या बॅक्टेरियाचा शोध लावला होता. त्यामुळे क्षयरोगाच्या निदानामध्ये आणि उपचारामध्ये मोठी मदत मिळाली होती. 


यंदाची वर्ल्ड टीबी डे ची थीम काय...
क्षयरोगाला टीबी असंही म्हटलं जातं. यावर्षी‘विश्व टीबी दिन 2022’ ची थीम ‘इनवेस्ट टू अँड टीबी. सेव्ह लाइव्स’ (Invest to End TB. Save Lives)’ अशी आहे. याचा अर्थ असा आहे की, टीबी संपवण्यासाठी मदत करा, जीवन वाचवा. डब्ल्यूएचओनं टीबीविरुद्धच्या लढाईसाठी  संसाधनं, मदत, सूचना देण्याचं आवाहन केलं आहे.  
 
टीबी अथवा क्षयरोग एक संसर्गजन्य आजार आहे. मायक्रो ट्युबरक्लुलोसिस बॅक्टेरियामुळे क्षयरोग होतो. या रोगाचा क्षयरोग ग्रस्त रोग्याच्या खोकणे किंवा शिंकणे या माध्यमातून अन्य लोकांमध्ये प्रसार होतो. या रोगाबद्दल योग्य मार्गदर्शन आणि उपचार केल्यास त्याचे निदान होऊ शकते. जर या रोगामध्ये निष्काळजीपणा केला तर त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. 


जागतिक आरोग्य संघटनेने 2030 पर्यंत या जीवघेण्या आजाराचे जगातून उच्चाटन करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी लक्ष निर्धारण आणि नियोजन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे, भारताने 2025 पर्यंत देशातून या रोगाचे उच्चाटन करण्याचा संकल्प केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, जगभरात दर दिवशी 4000 लोकांचा मृत्यू क्षयरोगाने होतो.





भारतात क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या मोठी असून आशियाई देशात भारताचा क्रमांक पहिला आहे. त्यामुळे भारत सरकारच्या वतीने जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या लक्षाच्या आधीच देशातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी कार्यक्रम आखण्यात आला आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha