China Coronavirus Lockdown : जगभरातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचं केंद्र असलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा जीवघेण्या कोरोनानं (Covid-19) डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये कोरोनाच्या विषाणूनं धास्ती वाढवली आहे. या विषाणूमुळेच चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असून दैनंदिन रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ होत आहे. चीनमध्ये नोंदवली जाणारी कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ही दोन वर्षांतील सर्वाधिक नोंद आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं याबाबत माहिती दिली आहे. चीनमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच, चीनमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळं जगाच्या चिंतेतही भर पडली आहे. 


चिननं पुन्हा चिंता वाढवली, रविवारी 3 हजार 300 नव्या रुग्णांची नोंद 


कोरोनाचे उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूनं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये अनेक शहरांत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहायला मिळत आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग होत आहे. रविवारी चीनमध्ये 3,393 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सुमारे दोन वर्षांनंतर चीनमध्ये पहिल्यांदाच 3 हजार 300 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. नॅशनल हेल्थ कमिशनच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी 2020 नंतर संसर्गाचा हा सर्वात मोठा दैनिक आकडा आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे अनेक शहरांमध्ये पुन्हा काही निर्बंधही लादले जात आहेत. अनेक शहरांमध्ये लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. शाळांमधील मुलांचे शिक्षणही विस्कळीत झाले आहे.


चीनमध्ये फोफावतोय कोरोना 


चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. चीनमधील शेनजेनमध्ये एका दिवसांत 66 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर शहरात लॉकडाऊन लावण्यात आला. यापूर्वी शुक्रवारी चांगचुनमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता. याव्यतिरिक्त शांडोंगच्या युचेंगमध्येही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. चीनमध्ये 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर चीनमध्ये काटेकोरपणे कोरोना नियमांचं पालन केलं जात आहे. 


जगाचा आकडाही वाढताच, 24 तासांत 13 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद 


जगभरात (World Corona Update) कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत जगात 13 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर  3579 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, चीनमध्ये 3100 रुग्णांची नोंद झाली असून गेल्या 2 वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे. दिवसागणिक झपाट्यानं वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळं चीनच्या शेनजेनमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यासोबतच येथे राहणाऱ्या 1.7 कोटी लोक पुन्हा एकदा आपापल्या घरांमध्ये कैद झाले आहेत. तर, शांघाईमधील शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. 


24 तासांतील सर्वाधिक रुग्णांची नोंद कोरियात (Koria)


गेल्या 24 तासांत सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद दक्षिण कोरियामध्ये झाली आहे. येथे 350,176 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर त्यानंतर जर्मनीमध्ये 213,264, व्हिएतनाममध्ये 166,968, फ्रांसमध्ये 60,422, इटलीमध्ये 48,886 आणि रशियात 44,989 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 


रशियात 596 रुग्णांचा मृत्यू (Russia)


गेल्या 24 तासांत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू रशियात झाले आहेत. येथे 596 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. याव्यतिरिक्त दक्षिण कोरियात 251 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इंडोनेशियात 215, मेक्सिकोमध्ये 203 लोकांनी आपला जीव गमावला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :