नवी दिल्ली : भारताचं मिसाईल चुकून पाकिस्तानच्या हद्दीत कोसळल्यानंतर आता पाकची पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी "आम्हीही भारताला प्रत्युत्तर देऊ शकलो असतो, पण आम्ही संयम ठेवला, धैर्य दाखवलं" असं म्हटलं आहे.
भारताकडून चुकीने एक क्षेपणास्त्र फायर झालं होतं. हे मिसाईल पाकिस्तानच्या मियाँ चन्नू भागात जाऊन कोसळलं. याप्रकरणी भारताने चौकशीचे आदेश दिले आहेत.
चुकून क्षेपणास्त्र सुटलं, पाकमध्ये कोसळलं
भारताचं सुपरसॉनिक मिसाईल 9 मार्च रोजी लाहोरपासून 275 किमी अंतरावर मियाँ चन्नू भागात कोसळलं होतं. त्यामुळे एका कोल्ड स्टोरेज अर्थात शीतगृहाचं नुकसान झालं होतं. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. त्यानंतर आता पाकिस्तानची प्रतिक्रिया आली आहे.
इम्रान खान यांची प्रतिक्रिया
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, "भारताचं मिसाईल जे पाकिस्तानात कोसळलं, त्याचं चोख उत्तर आम्ही देऊ शकलो असतो. मात्र आम्ही संयम ठेवला." एका रॅलीला संबोधित करताना इम्रान खान यांनी देशप्रेम जागवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी भारताबाबत आपण कडक भूमिका घेण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश पाकिस्तानातील जनतेला दिला.
इम्रान खान यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव
तिकडे पाकिस्तानात राजकीय उलथापालथी सुरु आहेत. इम्रान खान यांच्याविरुद्ध विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे इम्रान खान यांना आपली खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न करावा लागत आहे.
भारतातील तपास पुरेसा नाही : पाकिस्तान
याआधी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी (12 मार्च) म्हटलं होतं की, "या मिसाईल अपघाताबाबत भारताच्या उत्तराने आम्ही समाधानी नाही. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी संयुक्त तपासाची मागणी केली होती. भारताकडून कोणतं क्षेपणास्त्र डागलं होतं, त्याचे वैशिष्ट्ये काय आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे."
"एवढं गंभीर प्रकरण केवळ साधारण स्पष्टीकरणाने संपुष्टात येऊ शकत नाही. भारत अंतर्गच चौकशीबाबत बोलत आहे पण ते पुरेसं नाही, कारण मिसाईल पाकिस्तानात पडलं आहे. अशा परिस्थितीत आम्ही संयुक्त तपासाची मागणी करतो, जेणेकरुन प्रत्येक तथ्याची निष्पक्ष तपास केला जाऊ शकतो," असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.