Covid Lockdown in China :  चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढले आहे. अनेक शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 2019 मध्ये वुहान शहरात झालेल्या कोरोना विस्फोटाप्रमाणे पुन्हा एकदा चीनमध्ये महामारी पसरण्यास सुरुवात झाली आहे. चीनमध्ये रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्या तीन हजार 393 कोरोना रुग्ण आढळळे आहेत. सुमारे दोन वर्षांनंतर चीनमध्ये पहिल्यांदाच 3 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे चीनमधील नागरिकांची चिंता पुन्हा वाढली आहे. 


कोरोना महामारीचा उद्रेक पाहाता चीनमधील काही शहरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण चीनमधील टेक हब म्हणून ओळख असलेल्या शेन्जेन शहरात रविवारी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या शहराची लोकसंख्या एक कोटी 75 लाख 60 हजार इतकी आहे. या शहरात रविवारी 66 कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. शेन्जेन हे शहर हाँगकाँगच्या सीमेवर आहे. सध्या हाँगकाँगमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. काळजी म्हणून स्थानिक प्रशासनाने शेन्जेन शहरात लॉकडाऊन लागू केला आहे.  कोरोनाचा ननीव व्हेरियंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आल्याचे स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले.  




शनिवारी चीनमध्ये कोरोनाचे दोन हजार कोरोना रुग्ण आढळले होते. तर रविवारी ही संख्या एक हजारांपेक्षा जास्त वाढली. रविवारी चीनमध्ये तीन हजार 300 नवे कोरोना रुग्ण आढळले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोना महामारी डोक वर काढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले, शांघायमध्ये शाळा बंद
चीनमध्ये कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता प्रशासनाने खबरदारी म्हणून शांघायमधील शाळा सध्या बंद केल्या आहेत. यासोबतच कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी ईशान्येकडील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. देशातील सुमारे 19 प्रांतांमध्ये ओमिक्रॉन आणि डेल्टा प्रकारांचा प्रादुर्भाव आहे. जिलिन शहर अंशतः बंद करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, रशिया आणि उत्तर कोरियाच्या सीमेला लागून असलेले हुनचुन शहर वाढत्या कोरोना रुग्णांमुळे 1 मार्चपासूनच बंद करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात तीन तात्पुरती रुग्णालये बांधण्यात आले आहेत.


कोरोनामुळे जगभरात 60 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू
कोरोना विषाणू सर्वप्रथम चीनमध्येच आढळून आला होता. तेव्हापासून चीनमध्ये झिरो कोविड धोरण लागू आहे. चीनने लॉकडाऊन, प्रवासी बंदी यासह अनेक निर्बंध लागू केले होते. चीनवरच कोरोना विषाणू पसरवल्याचा आरोपही करण्यात आला होता. जगभरात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला आहेत. मात्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जगभराच्या चिंतेत वाढ झाली आहे.