नवी दिल्ली:  ज्यावेळी कुठलीही स्त्री आई होते त्यावेळी तो तिच्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो. यावेळी सर्वजण प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांचे देखील आभार मानतात. मात्र ब्रिटनमध्ये (Britain) एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. हे वाचून आपण नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. ब्रिटनमधील एका 20 वर्षीय दिव्यांग मुलीनं चक्क आपल्या आईच्या डॉक्टरवरच (Mother Doctor) खटला दाखल केला आहे. मुलीनं डॉक्टरविरोधात खटला दाखल करत म्हटलं होतं की, तिला कुठल्याही परिस्थितीत जन्म घ्यायचा नव्हता. मुलीचं म्हणणं आहे की, जर तिच्या आईच्या डॉक्टरांनी मनावर घेतलं असतं तर तिला जगात येण्यापासून रोखलं असतं. 


विशेष म्हणजे या प्रकरणात मुलीला लाखो रुपयांची नुकसानभरपाई देखील मिळणार आहे. हे प्रकरण सध्या सोशल मीडियात प्रचंड गाजत आहे. असं काय झालं की या मुलीनं डॉक्टरवर दावा ठोकला असा सवाल सर्वजण विचारत आहेत. साल 2001 मध्ये ब्रिटिश (British) मुलगी एवी टूम्ब्स (Evie Toombes) चा जन्म लिपोमायलोमेनिंगोसेले हा आजार सोबत घेऊनच झाला. हे एक प्रकारचं अपंगत्व आहे. ज्याला मेडिकलच्या भाषेत स्पायना बिफिडा (spina bifida) या नावानं ओळखलं जातं. या आजारामुळंच  एवी टूम्ब्सनं डॉक्टरवर केस करत नुकसानभरपाईची मागणी केली होती.  


एवी मोठी झाल्यानंतर तिच्या आईला औषधांसदर्भात योग्य सल्ला देण्यात अपयशी ठरल्याबाबत डॉ मिशेल (Dr Philip Mitchell) यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे.  एवीचं म्हणणं आहे की, डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्यामुळं ती दिव्यांग झाली. जर डॉक्टर मिशेल यांनी एवीच्या आईच्या गर्भधारणेच्या काळात योग्य औषधं दिली असती तर ती सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगू शकली असती. मात्र डॉक्टरांच्या चुकीमुळं तिची ही अवस्था झालीय.  


यामुळं एवीनं डॉक्टरांवर खटला दाखल करत नुकसानभरपाई म्हणून लाखो पाऊंडची मागणी केली आहे. एवीची आई आता 50 वर्षांची आहे, ज्यावेळी त्या 30 वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांनी डॉक्टर मिशेल यांच्याकडून प्रसूती करुन घेतली होती. त्यावेळी  डॉ मिशेल यांनी एवीच्या आई कॅरालिनला फोलिक अॅसिड न घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र स्पायना बिफिडाला रोखण्यासाठी किंवा त्याच्या महत्वाविषयी माहिती दिली नव्हती. कॅरालिन यांनी सांगितलं की, डॉक्टरांनी सल्ला दिला होता की, चांगला डायट घेत असाल तर फॉलिक अॅसिडची गरज नाही. 


या प्रकरणात न्यायाधीश रोजालिंड कोए क्यूसी यांनी एवीच्या प्रकरणात तिची बाजू योग्य असल्याचं म्हटलं आहे. लंडन उच्च न्यायालयात यावर ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे. ज्यात हे मान्य केलं आहे की, जर तिच्या आईला योग्य सल्ला दिला असता तर तिनं एका सामान्य मुलाला जन्म दिला असता. न्यायाधीशांनी निर्णय सुनावताना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.