Greenhouse Gas : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षात हरित वायू उत्सर्जनामध्ये विक्रमी वाढ झाल्याचं जागतिक हवामान संघटनेनं (World Meteorological Organization) आपल्या अहवालात म्हटलं आहे. कोरोना काळात जगभरात जरी तात्पुरतं लॉकडाऊन करण्यात आलं असलं तरी त्याचा कोणताही परिणाम हरित वायूंच्या उत्सर्जनावर झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या वर्षीचा उत्सर्जनाचा दर हा गेल्या दशकतील सरासरी वाढीपेक्षाही अधिक असल्याचं जागतिक हवामान खात्यानं आपल्या अहवालात म्हटलं आहे. कार्बन डायऑक्साईड (Carbon Di-Oxide), मिथेन यासारख्या जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत वायूंच्या संबंधी हा अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो.


पॅरिस करारानुसार या दशकाच्या अखेरपर्यंत पूर्व-औद्योगिक क्रांतीच्या ( Pre-Industrial Times) तापमानाच्या तुलनेत 1.5 ते 2 डीग्री सेल्सिअसपर्यंत तापमान वाढ नियंत्रणाचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. ते जास्तीत जास्त 1.5 डीग्री सेल्सिअसपर्यंत नियंत्रित राहिल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पण सध्याची ही वाढ लक्षात घेता त्यापेक्षाही जास्त तापमान वाढ होण्याची शक्यता आहे असं जागतिक हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.


 






पूर्व औद्योगिक क्रांतीच्या स्तरापेक्षा म्हणजे,1750 सालच्या तुलनेत कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड या वायूंच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झाली आहे. कार्बन डाय ऑक्साईड मध्ये तर तब्बल 149 टक्क्यांची वाढ झाल्याचे जागतिक हवामान खात्याने आपल्या अहवालात म्हटलं आहे. साधारणपणे औद्योगिक क्रांती नंतर मानवी कृत्यामुळे प्रदूषणात वाढ होत असून पृथ्वीचा समतोल बिघडल्याचे सांगण्यात येतं.


2015 साली कार्बन डाय ऑक्साईडचे हवेतील प्रमाण हे 400 पार्ट्स मिलियन इतकं होतं. केवळ पाच वर्षाच्या काळात त्यात मोठी वाढ होऊन आता ते 413.5 पार्ट्स मिलियन इतकं झालं आहे. कोरोना काळातील नियंत्रणामुळे जीवाश्म इंधनाच्या (Fossile Fuel) वापरात 5.6 टक्क्यांची घट जरी झाली असली तरी गेल्या दशकाच्या सरासरीच्या तुलनेत कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात विक्रमी वाढ झाली आहे आणि ही गोष्ट चिंताजंक आहे.


हवामान बदलसंबंधी महत्वाची असलेली परिषद COP 26 ही 31 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या दरम्यान ग्लासगो या ठिकाणी होणार आहे. पॅरिस करारला पाच वर्षे पूर्ण झाली असून आतापर्यंत त्यावर काय कृती करण्यात आली आहे, त्यावर भविष्यात कशा पद्धतीचं धोरण आखायला हवं यावर या बैठकीत उहापोह करण्यात येणार आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर जागतिक हवामान खात्याचा हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.


हरित वायू कोणते आहेत? 
क्योटो प्रोटोकॉलमध्ये नमूद केल्याप्रमाणे जागतिक तापमान वाढीसाठी मुख्य सहा हरितगृह वायू कारणीभूत आहेत. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, हायड्रोफ्लुरोकार्बन, परफ्लुरोकार्बन आणि सल्फर हेक्साफ्लुरॉईड यांचा समावेश होतो. या हरित वायूमुळे जागतिक तापमानात मोठी वाढ होत असून परिणामी पृथ्वीचा समतोल बिघडत आहे.


महत्वाच्या बातम्या :