जकार्ता : पती-पत्नीमध्ये रुसवे-फुगवे होतच असतात. पण अनेकदा छोट्या वादाचं रुपांतर मोठ्या घटनांमध्ये होतं. इंडोनेशियामध्ये अशीच एक घटना समोर आली, जी ऐकून/वाचून तुमच्याही अंगावर शहारा येईल. पतीने मोबाईल फोनचा पासवर्ड न दिल्याने एका महिलने त्याला जिवंत जाळलं. डेडी पूरनामा असं पतीचं नाव असून तो 26 वर्षांचा होता.

इंडोनेशियाच्या वेस्ट नूसा टेंगाराच्या ईस्ट लोम्बाक रिजन्सीमध्ये ही घटना घडली. डेडी त्याच्या घराचं छप्पर दुरुस्त करत होता. त्यावेळी त्याची पत्नी इल्हाम चाहयानीने (वय 25 वर्ष) त्याच्या मोबाईल फोनचा पासवर्ड मागितला. पण डेडीने पासवर्ड देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. यावेळी डेडीने इल्हामला मारहाण केली.

पण याचवेळी इल्हामने त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जाळलं. डेडी पूरनामा पूर्णत: भाजला आणि घटनेच्या दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, "डेडी पूरनामा छतावरुन खाली उतरला आणि त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केल्यानंतर वाद खूपच वाढला. यावेळी चाहयानीने पेट्रोलचं एक कॅन उचललं आणि पेट्रोल पतीवर फेकलं. यानंतर लायटरने आग लावली. पूरनामाला केरुआक हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं, पण दोन दिवसांनी त्याने प्राण सोडले."

26 वर्षीय पूरनामाच्या शरीराचा वरचा भाग पूर्णत: भाजला होता. डेडी पूरनामाची पत्नी चाहयानीला अटक केली असून ती पोलिस कोठडीत आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.