इस्लामाबाद : पाकिस्तानच्या मुल्तानमध्ये एक विचित्र प्रकारचा लग्न सोहळा पार पडला आहे. बहिणीला सोडून  राहू शकत नसल्याने, एका महिलेने आपल्याच नवऱ्याशी तिचा ‘निकाह’ लावून दिला. पाकिस्तानच्या दुनिया न्यूजने याबाबतची बातमी प्रसारित केली आहे.


दुनिया न्यूजच्या बातमीनुसार, मुल्तानमधील फराज नावाच्या व्यक्तीचा दीड महिन्यापूर्वीच अलीना नावाच्या मुलीशी निकाह झाला. पण काही दिवसांपूर्वीच अलीनाने आपल्या चुलत बहिणीसोबत म्हणजे, अल्सिमासोबत फराजला दुसरा निकाह करायला लावला. आपल्या बहिणीला सोडून राहू शकत नसल्याने, तिने आपल्या नवऱ्यासोबतच अलिस्माचं लग्न लावल्याचं अलीनाने सांगितलं.

लहानपणीपासून अलीना आणि अलिस्मा दोघेही एकत्रच वाढल्या, शाळेतही एकत्रच जात होत्या, प्रत्येक काम दोघी मिळूनही एकत्र करायच्या. त्यामुळे दोघींनाही एकमेकींचा लळा लागला होता. अलीनाच्या लग्नानंतर काही दिवस कसेबसे गेले. पण बहिणीच्या आठवणीने ती व्याकूळ झाली. त्यावेळी तिने तिचं लग्न आपल्या नवऱ्याशी लावून देण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या निर्णयामुळे अलीन आणि अलिस्मा दोघेही सुखात नांदत असल्या, तरी समाजातून त्यांना विरोध होत आहे. फराज आणि त्याच्या दोन्ही पत्नींना सातत्याने धमकावण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

दुसरीकडे या अजब लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. काही यूजर्सनी या माध्यमातून इस्लामिक प्रथा-परंपरांवर निशाणा साधला आहे. काही यूजर्सनी म्हटलंय की, दोन लग्न करुन मुलाचा भाग्योदय झाला आहे. तर काहीजण या दोन बहिणींचं लग्न हा त्यांचा वैयक्तीक आयुष्याचा विषय असल्याचं सांगून, त्यात दुसऱ्यांनी दखल देऊ नये, असा सल्ला दिला आहे.