वॉशिंग्टन : देशभरात सध्या थंडीची लाट पसरली आहे, तशी परदेशातही कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीमुळेच पाण्यासोबत मगरीही गोठल्याची धक्कादायक घटना अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये घडली आहे.
वॉशिंग्टनमधल्या एका पार्कमध्ये घसरलेल्या तापमानामुळे तलावातलं पाणी गोठलं. सोबतच त्या तलावात असलेल्या अनेक मगरीही पाण्यातच गोठून गेल्या. त्यानंतरही या मगरी जिवंत असल्याचा दावा केला जात आहे. फेसबुकवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे वॉशिंग्टनमधलं पार्क गजबजून गेलं आहे.
मगरींना अशा वातावरणाची अंगभूत सवय असते. वातावरणात झालेल्या बदलांप्रमाणे त्या आपल्या शरीरात बदल करुन घेतात आणि नाक पाण्याबाहेर काढून निद्रावस्थेत जातात. एकदा पाणी वितळलं की मगरी पुन्हा जागृतावस्थेत येतात.
निद्रावस्थेत असताना मगरींच्या जवळ गेल्यास त्या कोणतीही हालचाल करत नाहीत. कारण शरीरातलं तापमान संतुलित ठेवण्यासाठीची ऊर्जा त्या दुसरीकडे खर्च करत नाहीत. मगरींची जिवंत राहण्याची ही कला अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.