मुंबई : इराकमधील अमेरिकेच्या धडकल्यानंतर शुक्रवारी 'विश्वयुद्ध 3' जगभरात ट्रेंड होऊ लागला आहे. अमेरिकन हवाई हल्ल्यात इराणी विशेष सैन्याच्या प्रमुख जनरल कासिम सुलेमानी यांच्यासह आठ जण ठार झाले. या हल्ल्याच्या काही तासांतच लोकांनी गुगल आणि इतर सोशल मीडिया साइटवर तिसऱ्या महायुद्धाचा शोध सुरू केला. यादरम्यान, गुगलवर 'वर्ल्ड वॉर 3' साठी शोध अचानक वाढला. तर इराण हा शब्द दहा लाखाहून अधिक वेळा शोधला गेला आहे. दुसरीकडे # इराण, #WoldWar3 आणि # WWIII सारखे ट्रेंडिंग हॅशटॅग्स ट्विटरवर सुरूच आहेत.

अमेरिकेनं इराकची राजधानी बगदादमध्ये एअर स्ट्राईक केला. बगदादमध्ये झालेल्या त्या हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाले. याबाबत पेंटागॉननं एक पत्रक जारी करुन एअरस्ट्राईकचा खुलासा केला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंच हा एअर स्ट्राईक झाल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे.

मेजर जनरल कासिम सुलेमानी इराणच्या कद्स फोर्सचे प्रमुख होते. कासिम सुलेमानी यांचा ताफा बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात असताना अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये कासिम सुलेमानींसह हाशेद-अल-शबिबी फोर्सचे उपप्रमुखही ठार झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज ट्विट करत अप्रत्यक्ष संदेश दिला.

अनेक अमेरिकी नागरीकांच्या हत्येचा आरोप सुलेमानीवर होता. इराणमधल्या अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला केल्याचाही आरोप सुलेमानीवर होता. ट्रम्प यांचे कट्टर विरोधक आणि अमेरिकेला कायम धमक्या देण्याचं काम सुलेमानी यांनी केलं आहे. सेना प्रमुख असल्यानं सुलेमानींकडेच कुड्स सेनाचे नेतृत्व होतं. 2019 च्या एप्रिल महिन्यात अमेरिकेनं इराण रिव्हॉल्युशनरी गार्डसह कुर्द सेनेला 'परदेशी दहशतवादी संघटना' म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतरही त्यांच्या कारवाया सुरुच होत्या. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सुलेमानी यांना इशारा दिला होता. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अमेरिकेनं एअर स्ट्राईक केला.

11 मार्च 1957 रोजी कासिम सुलेमानी यांचा इराणच्या कर्मन प्रांतात जन्म झाला.1980 साली इराक विरुद्ध सुरु असलेल्या युद्धावेळी सुलेमानी इराणी सैन्यात सामील झाले. पुढे आठ वर्ष त्यांनी सैन्याच्या एका तुकडीचं नेतृत्व केलं. इराकविरोधात झालेल्या अनेक कारवायांमध्ये जनरल सुलेमानी यांचा सहभाग होता. इतकंच नाही तर लेबनॉन, सीरिया आणि अफगाणिस्तानध्ये इराणने केलेल्या कारवाया या सुलेमानी यांचा हात असल्याचा दावा केला गेला. म्हणूनच की काय इराणचे शाह खोमेनी त्यांनी लिव्हिंग मार्टिर म्हणजेच जीवंत हुतात्मा म्हणायचे

इतक्या जवळच्या माणसाची हत्या झाल्यानंतर इराणचे शाह शोमेनी पेटून उठले त्यांनी थेट अमेरिकेलाच धमकी दिली. त्यासंदर्भातलं खोमेनी यांचं भाषण स्थानिक वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आलं. दुसरीकडे येत्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक होणार आहे. त्यासाठीच ट्रम्प यांनी हा एअरस्ट्राईक घडवून आणल्याचा आरोप विरोधकांनी केला. शिवाय एअर स्ट्राईकमुळे दोन्ही देशांमधली परिस्थिती आणखी वाईट होईल. त्याचा जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचाच प्रत्यय वाढलेल्या तेलाच्या किंमतीतून आला आहे. भारत आणि इराणचे तसे कायम चांगले संबंध राहिले आहेत. त्यामुळे आजच्या एअरस्ट्राईकचा भारतावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.