Sheikh Hasina Resigns : बांग्लादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं असून त्याची परिणती आता हिंसाचारामध्ये (Bangladesh Violence) झाली आहे. या आंदोलनात आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि देश सोडला आहे. त्यामुळे बांग्लादेशी लष्कर आता देशात अंतरिम सरकार स्थापन करणार आहे.
बांग्लादेश हे भारताचे मित्रराष्ट्र असून शेख हसीना यांचे सरकार भारतधार्जिने असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे.
बांग्लादेशमधील उलथापालथीमागे असलेले पाच महत्त्वाचे मुद्दे,
1. बांगलादेशमधील अस्थिरतेचे नेमके कारण काय?
शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन चालू आहे. 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये 30 टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना 5 टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते.
2. आंदोलनामुळे हिंसाचार सुरू
आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी शेख हसीना यांचा राजीनामा मागितला. बांग्लादेशातील आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला आणि त्यामध्ये 300 आंदोलकांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले. त्यानंतर ढाक्यातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. पोलिसांकडून देशात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली.
3. शेख हसीना यांचा राजीनामा
शेख हसीना या 2009 पासून बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. बांग्लादेशातील हिंसाचाराने उग्र रूप धारण केल्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी देश सोडला.
4. लष्कर अंतरिम सरकार स्थापन करणार
शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढच्या 48 अंतरिम सरकार स्थापन करण्यात येईल असं लष्कर प्रमुख वकार-उर-झमान यांनी सांगितलं. बांग्लादेशातील कर्फ्यु हटवण्यात आला असून हिंसाचार आटोक्यात आणण्याचा लष्कराचा प्रयत्न आहे.
5. भारतावर काय परिणाम?
शेजारच्या बांग्लादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचाराचा परिणाम भारताच्या सुरक्षेवर होऊ शकतो. भारतात इस्लामी दहशतवादी सक्रिय होऊ शकतात अशी चिंता व्यक्त करण्यात येतेय. बांगलादेशमधील ताज्या घडामोडी लक्षात घेता सीमा सुरक्षा दलाने (BSF) भारत-बांगलादेश सीमेच्या 4,096 किमी परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बांगलादेशातील हिंसाचारासंदर्भात भारताकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भारतीयांनी बांगलादेशमध्ये जाऊ नये, बांगलादेशचा प्रवास टाळावा अशा नव्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. बांग्लादेशमध्ये असणाऱ्या भारतीयांसाठी तीन आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
या आधी पाकिस्तान, श्रीलंकेमध्ये हिंचारार उफाळला होता, आता बांग्लादेशमध्येही तशीच परिस्थिती आहे. बांग्लादेशमध्ये निर्माण झालेली ही स्थिती संपूर्ण दक्षिण आशियासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे बांग्लादेशात शक्य तितक्या लवकर लोकशाही सरकार स्थापन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे.
ही बातमी वाचा: