जीनेव्हा: WHO चे अध्यक्ष टेड्रोस गेब्रेयसस यांनी कोरोना विरोधात भारताने घेतलेल्या निर्णयांची स्तुती केली आहे. कोरोना विरोधात भारताने उचललेल्या पाऊलांचे कौतुक करताना WHO चे अध्यक्ष टेड्रोस गेब्रेयसेस यांनी एक ट्वीट केलं आहे आणि त्यामध्ये पंतप्रधान मोदींना टॅग केलं आहे.
टेड्रोस गेब्रेयसस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "भारताने कोरोनाचा नाश करण्यासाठी निर्णायक लढा सुरु केला आहे. भारत आता जगातील सर्वात मोठा कोरोना लस उत्पादक देश म्हणून भूमिका पार पाडायला तयार झाला आहे. यापुढे आपण संघटित प्रयत्न केले तर या प्रभावी लसीचा वापर करुन दुर्बल लोकांचा जीव वाचवण्याचं लक्ष्य निश्चित करु शकतो."
या आधीही केली भारताची स्तुती
भारताने कोरोना काळात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची WHO ने या आधीही स्तुती केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही स्तुती WHO ने केली आहे. भारताने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर WHO ने भारताच्या या निर्णयाचं स्वागत केलं होतं, त्यामुळं कोरोनाच्या संक्रमणास आळा बसेल अशी आशाही व्यक्त केली होती.
DCGI ने लसीच्या वापराला मंजूरी दिली
ड्रग कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारतात सीरम इन्स्टिट्यूटच्या 'कोविशील्ड' आणि भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन' च्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. भारताच्या या निर्णयाचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्वागत केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशाच्या डायरेक्टर डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी सांगितलं की, "भारताच्या या निर्णयामुळे कोरोनाचा प्रभाव कमी होण्यास नक्की मदत होईल."
संबंधित बातम्या:
- Coronavirus Updates | इंग्लंडमध्ये पुन्हा सक्तीचा लॉकडाऊन लागू
- Coronavirus Vaccine update : मुंबईत जम्बो लसीकरण केंद्र, दिवसाला 50 हजार लोकांना लस देण्याची व्यवस्था
- Corona UK Strain : महाराष्ट्रात नवीन कोरोनाचे रुग्ण! मुख्यमंत्री केंद्राला करणार 'ही' विनंती
- सीरमच्या कोरोना लसीची किंमत किती? आदर पूनावालांनी दिली माहिती