When Will The Vaccine Be Ready For Omicron : जगभरात कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे. सध्या हा वाद सुरु आहे की, आधीपासून असलेली लस कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या विरोधात प्रभावी ठरेल की, नाही? की, आता आलेल्या नव्या व्हेरियंटसाठी नवी लस तयार करावी लागेल. फार्मा कंपनी मॉडर्ना इंकन यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. मॉडर्ना इंकच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन (Omicron) स्ट्रेनशी लढण्यासाठी एक नवीन लस आवश्यक असल्यास 2022 च्या सुरुवातीपर्यंत ती तयार होऊ शकते. अशातच कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंट डेल्टाहून अधिक धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. चिंता व्यक्त केली जात आहे की, कोरोनाच्या सध्याच्या लसीचा त्यावर परिणाम होऊ शकत नाही. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मॉर्डनाच्या वतीनं करण्यात आलेलं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.
जवळपास 14 देशांमध्ये ओमिक्रॉनचा व्हेरियंट
दरम्यान, ओमिक्रॉनचा संसर्ग अधिक वेगानं होत असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत जगभरातील जवळपास 14 देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी जगानं कोरोनाच्या डेल्टा व्हायरसची भीषणता अनुभवली आहे. अशातच अनेक देशांनी आधीच सतर्क होत अनेक उपाययोजना केल्या आहेत. तसेच या अनुषंगानं काही निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. दक्षिण आफ्रिकेमध्ये 24 नोव्हेंबर रोजी ओमिक्रॉन आढळून आल्याची माहिती डब्ल्यूएचओच्या वतीनं देण्यात आली होती.
काय आहेत लक्षणं?
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय संचारी रोग संस्थान (एनआयसीडी) च्या वतीनं सांगण्यात आलं आहे की, ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण एखाद्या व्यक्तीला झाली तर त्या व्यक्तीमध्ये फारशी काही वेगळी लक्षण दिसून येत नाहीत. एनआयसीडीनं दिलेल्या माहितीनुसार, असंही सांगितलं जात आहे की, डेल्टाप्रमाणेच ओमिक्रॉननं बाधित झालेल्या व्यक्ती एसिम्टोमेटिक होत्या. अशातच एनआयसीडीनं असं मानलं जातंय की, ओमिक्रॉननं बाधित व्यक्तीमध्ये फारशी वेगळी लक्षण दिसत नाहीत.
ओमिक्रॉनची सौम्य लक्षणं मात्र तरुणांना धोका अधिक, तज्ज्ञांचा दावा
एएनआयच्या वृत्तानुसार, या व्हेरिएंटमुळे सौम्य आजार होण्याची शक्यता असल्याचं दक्षिण आफ्रिकेतील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष एंजेलीक कोएट्जी यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, 'या आजाराचे सौम्य लक्षणं दिसत आहे. यामध्ये स्नायू दुखणे, थकवा जाणवणे, अथवा दोन दिवस आजारी राहण्यासारखी लक्षणं दिसत आहेत. आतापर्यंत या व्हेरिएंटमुळे वास न येणं यासारखी समस्या कुणामध्येही जाणवली नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये थोड्याफार प्रमाणात कफ होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनने संक्रमित झालेले रुग्ण घरातच उपचार घेत आहेत.'
कसं पडलं ओमिक्रॉन नाव?
कोरोना महासाथीच्या सुरुवातीपासूनच जागतिक आरोग्य संघटना चीनच्या दबावात काम करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. अमेरिका, युरोपीयन देशांनी सातत्याने हा आरोप केला. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटला नाव देताना ग्रीक वर्णमालेतील 15 वे अक्षर ओमिक्रॉनची निवड करण्यात आले. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने जाणूनबुजून व्हेरिएंटच्या नावासमोरील दोन अक्षर वगळले.
ग्रीक वर्णमालेतील 13 वे अक्षर NU (V), 14 वे अक्षर जाई (XI) या दोन अक्षरांना सोडले. नवीन विषाणूबाबत गोंधळ होऊ नये यासाठी Nu हा शब्द सोडून देण्यात आला. मात्र, 14 वे अक्षर XI सोडून दिले कारण हे सामान्य उपनाम आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या या निर्णयावरून पुन्हा चर्चेला तोंड फुटले आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जाणीवपूर्वक XI नाव वगळले असल्याचा आरोप काही देशांनी केला आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा